संवाद… विवेकानंद व्याख्यानमालेच्या निमित्ताने….!
संवाद… विवेकानंद व्याख्यानमालेच्या निमित्ताने….!
January 9, 2020
मागील वर्षापासून विवेकानंद महाविद्यालयाने स्वतःची सामाजिक जबाबदारी व भान वाढविण्याच्या अनुषंगाने एक व्यापक आणि प्रबोधनपुरक उपक्रम सुरु केला आहे….. “विवेकानंद व्याख्यानमाला” !!!
विवेकानंद शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक कै. पंढरीनाथ भाऊ पाटील ढाकेफळकर यांचा स्मृतिदिन (सात जानेवारी) आणि स्वामी विवेकानंद जयंती (युवा दिन-बारा जानेवारी) हे निमित्त साधून महाविद्यालयाने ही तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे.
‘विवेकानंद व्याख्यानमाला’ आता महाविद्यालयाची ओळख झाली, जबाबदारी झाली आणि परंपराही !!
याच अनुषंगाने आता दि. ०९, १० व ११ जानेवारी, २०२० या दिवशी अनुक्रमे व्यासंगी लेखक, संपादक व समकालीन माध्यमांच्या गोंगाट व अवनितीच्या काळात खंबीर भूमिका घेऊन नवीन मानदंड प्रस्थापित करणारे निर्भीड पत्रकार मा. श्री. गिरीश कुबेर “’समकालीन प्रसार माध्यमे: मूल्ये, आव्हाने आणि भवितव्य”’ या विषयावर तर भारतातील जिवंत व मृतप्राय भाषांचे संशोधन-सर्वेक्षण करणारे प्रख्यात लेखक, समीक्षक व भाषाशास्त्रज्ञ मा. श्री. गणेश देवी “’भारतीय मातृभाषांचे भवितव्य”’ या विषयावर तसेच वंचित विशेषतः दारिद्र्य, व्यसनाधीनता व गुन्हेगारीचा शाप असणारया फासेपारधी बालकांच्या शिक्षणासाठी आपल्या ‘प्रश्नचिन्ह’ शाळेद्वारे प्रयत्नरत तरुण-संवेदनशील आणि कृतीशील व्यक्तिमत्व मा. श्री. मतीन भोसले महाविद्यालयात आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत. यावेळी त्यांची प्रेरणा, अनुभव व भविष्यातील वाटचाल कथन करणारे व्याख्यान नि प्रकट मुलाखत होणार आहे.
अराजकीय, प्रत्यक्ष कार्यानुभव घेणारे आणि समाजासाठी समर्पित अभ्यासक-कार्यकर्ते आमंत्रित करून महाविद्यालयाने सामाजिक जाणीव आणि बांधीलकी वृद्धिंगत करणारा हा धाडसी उपक्रम हाती घेतला आहे. सायंकाळी सहा वाजता महाविद्यालयाच्या हिरवळीवर सुरु होणाऱ्या या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी-पालक-शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासोबतच शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि माध्यम प्रतिनिधींनी उपस्थिती लावावी, ही महाविद्यालयाची आग्रही विनंती आहे.
धन्यवाद..!
प्रा. श्याम शिरसाठ
प्राचार्य, विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद