देवगिरी महाविद्यालयात डॉ. सी. व्ही. रमण व्याख्यानमालाचे समारोप
विज्ञानात क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचे अन्यन्यसाधारण महत्व – डॉ. सुभाष बेहरे
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयात ‘डॉ. सी. व्ही. रमण व्याख्यानमाला’ अंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. दि. ०२.०२.२०२४ रोजी ‘अंतराळ विज्ञान – क्षेपणास्त्र तंत्रज्ञान’ या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाचे भौतिकशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सुभाष बेहरे यांचे दुसरे व्याख्यान झाले. यावेळी विचारमंचावर कार्यक्रमांचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल आर्दड, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. संतोष मोरे उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना डॉ. सुभाष बेहरे म्हणाले की, ” क्षेपणास्त्र तंत्रज्ञान या विषयात भारताने अनेक संशोधने केली आहेत. भारताने ब्राम्होस, अग्नी या सारखी अनेक क्षेपणास्त्रे बनवली आहेत. तसेच क्षेपणास्त्र तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थांना अनेक संशोधन संधी उपलब्ध आहेत. या करिता विद्यार्थानी भौतिकशास्त्र, अंतराळ विज्ञान, क्षेपणास्त्र तंत्रज्ञान या सारख्या विषयात सखोल अभ्यास व संशोधन करणे आवश्यक आहे.” यावेळी त्यांनी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान बद्दल सविस्तर माहिती देतांना ‘भारतीय बनावटीच्या अग्नी क्षेपणास्त्र ‘ चे भारतीय सैन्यातील महत्व सांगितले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. अनिल आर्दड म्हणाले की, ” विद्यार्थांनी भौतिकशास्त्र या विषयाची भीती न बाळगता , या विषयाचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे तरच क्षेपणास्त्र तंत्रज्ञान सारख्या विषयामध्ये संशोधन करता येईल.” या कार्यक्रमास विदयार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संतोष मोरे व सूत्रसंचालन डॉ. रणजित मिस्त्री यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. मनीषा पाटील, सुवर्णा पाटील आदींनी परिश्रम घेतले.