शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधींच्या ‘नई तालीम’चे प्रात्यक्षिकांसह दर्शन

ज्येष्ठ गांधीवादी एस.के.एच. स्वामी यांच्या व्याख्यानाने भारावले प्रेक्षक

कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या शिक्षणविषयक विचारांचा जागर घालत असताना आजची सकाळ ही ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत एस. के. एच. स्वामी यांनी ‘नई तालीम’मय करून सोडली. महात्मा गांधी यांच्या ‘नई तालीम’विषयक विचारांचा वेध घेत असताना स्वामी यांनी आपल्या वक्तव्याला दिलेली प्रात्यक्षिकांची जोड ही उपस्थित प्रत्येक प्रेक्षकाला भारावून टाकणारी ठरली. शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र, दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र, नेहरू अभ्यास केंद्र, समाजकार्य विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गांधीवादी विचारवंत एस.के.एच. स्वामी यांचे ‘नई तालीम: भारतीय शिक्षणाचा प्रयोग’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. स्वामी यांनी महात्मा गांधी यांचे ‘नई तालीम’च्या अनुषंगाने असणारे विचार केवळ मौखिक पातळीवर न सांगता या उपक्रमामागील गांधीजींचे हेतू विषद करून सांगितले. आपल्या व्याख्यानास त्यांनी विविध प्रात्यक्षिकांची जोड दिल्याने ते प्रभावीपणे पोहोचले. यामध्ये चरख्यावर सूतकताई कशी करतात, इथंपासून ते घरातल्या प्रत्येक टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार कशी करावी, इथेपर्यंतच्या बाबींचा समावेश होता. एकीकडे पैशाची बचत करणे आणि दुसरीकडे बचत हेच संवर्धन हा मूलमंत्रही देणे, अशा दुहेरी पातळीवर श्री. स्वामी यांनी संवाद साधला. गांधीजींना अभिप्रेत स्वच्छता संस्कार, खादीचे, स्वदेशी बनावटीच्या वस्तूंचे महत्त्व, स्वयंपूर्णता व स्वावलंबन, पर्यावरणस्नेही व मानवकेंद्री समाजाच्या अपेक्षा यांविषयीही त्यांनी विवेचन केले.

श्री. स्वामी म्हणाले, महात्मा गांधी शरीररुपाने हयात नसले, तरी त्यांचे सिद्धांत, शिकवण ही अमरच राहील. अभ्यासायला एक आयुष्य पुरणार नाही, इतके समग्र लेखन त्यांनी केलेले आहे. चरख्याकडे ते स्वावलंबनाचे प्रतीक म्हणून पाहात. हे कौशल्य अवघ्या दोन मिनिटांत आत्मसात करता येते. प्रत्येक घरात खादी वापरली गेली पाहिजे. त्यातून पाश्चात्य कपड्यांवर होणारा अनाठायी खर्च वाचून बचत होईल. रुपयाची कदर करून जितकी बचत कराल, तितके आयुष्य समाधानी बनेल. कारण बचत हेच संवर्धन आहे. झाडूला अर्थात स्वच्छतेला आदर देणे गांधीजींना अभिप्रेत होते. या देशातील प्रत्येक मनुष्याने घरातील व समाजातील वर्तन व वाचा एकसारखी ठेवली, तर देशाचे कल्याण होईल. आपल्या आरोग्य रक्षणाच्या सर्व सुविधा घराच्या स्वयंपाकघरातच असताना आपण मात्र बाजाराच्या रेट्याला बळी पडतो आणि बाजार आपले शोषण करतो. म्हणून गांधीजी स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. देशातल्या आणि जगातल्या गोरगरीबांच्या गरजांचा विचार करून उच्चशिक्षण क्षेत्राने त्या गरजांच्या पूर्तीसाठी संशोधनकार्य करणे गांधींना अपेक्षित असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Advertisement

यावेळी डॉ. अशोक चौसाळकर यांनी महात्मा गांधींच्या उच्चशिक्षण क्षेत्राकडून असलेल्या अपेक्षांविषयी विवेचन केले. ते म्हणाले, महात्मा गांधी यांच्या प्राथमिक व प्राध्यमिक शिक्षणाच्या विचारांचा जितका अभ्यास झाला, तितका उच्चशिक्षणाच्या अनुषंगाने झाला नाही. गांधींच्या मागणीमुळेच देशात गुजरात, काशी आणि टिळक विद्यापीठे स्थापन झाली. त्यांमधील अभ्यासक्रमाचे स्वरुप कसे असावे, हेही त्यांनी सांगितले होते. उच्चशिक्षणाच्या बाबतीत भारताने पाश्चात्यांचे अंधानुकरण थांबवावे. भारतीय व्यवस्था व येथील मूल्यांवर आधारित शिक्षण असावे. सर्व विषयांचे शिक्षण विद्यापीठामध्ये असावे. शेतीचे शिक्षण देत असताना प्रयोगांना प्रोत्साहन द्यावे. शिक्षण व शेती यांच्यात एकात्मता असावी. भारतीयांसाठी उपयुक्त अशा संशोधनाला चालना देण्यात यावी. शिक्षकांना योग्य वेतन द्यावे, पण लठ्ठ पगार देऊ नयेत, त्यामुळे विद्यापीठांची स्वायत्तता धोक्यात येण्याची शक्यता असते, अशी भूमिका गांधीजींनी मांडलेली आहे.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिक्षणाचा समग्र विचार न करता आपण केवळ अभ्यासक्रम म्हणून त्याकडे पाहतो, ही फार मोठी गफलत आहे. व्यवहारकुशलता हा शिक्षणाचा मूळ गाभा बनायला हवा. गांधींनी आपल्याला पर्यावरणकेंद्री जीवनमूल्ये शिकविली. प्रत्यक्षात आपली वाटचाल त्याउलट सुरू आहे. कार्यानुभव हा आपल्या विषयपत्रिकेवरील सर्वोच्च प्राधान्याचा विषय असायला हवा. गरज आणि हव्यास यामधील सीमारेषाच आपण पुसून टाकल्याने आजच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. गांधीविचारांना अनुसरले तर संतुलन साधणे शक्य आहे. त्यांचा विचार हा समन्वयाचा आणि आजच्या परिभाषेत वर्तुळाकार अर्थव्यवस्थेचा आहे. श्री. स्वामी यांच्या व्याख्यानातून त्यांच्या कृतीशील गांधीवादी आचरणाचे दर्शन घडल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सकाळी ठीक ११ वाजता दोन मिनिटे मौन पाळून स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. गांधी अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रकाश पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नेहरू अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपकुलसचिव डॉ. संजय कुबल यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page