अमरावती विद्यापीठात आजीवन अध्ययन अभ्यासक्रमाकरीता विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी प्रचंड मागणी
अमरावती : एम ए समुपदेशन व मानसोपचार आणि एम ए छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा आणि व्यवस्थापन या अभ्यासक्रमास समाजातील सर्व स्तरातील पदवीधर युवक – युवती, प्रौढ व्यक्ती, गृहिणी महिला, ज्येष्ठ नागरिकांची सुद्धा प्रवेशाकरिता प्रचंड मागणी असून शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये विद्यापीठाने निर्धारित करून दिलेल्या आसन क्षमतेपेक्षा विद्यार्थ्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे 10 टक्क्यांची वाढीव मागणी आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत करण्यात आली व ती कुलगूरू डॉ मिलींद बारहाते यांनी मान्य केली.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामध्ये कौशल्य विकासावर आधारित विविध पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रम सुरू आहेत. त्यामध्ये एम ए / पी जी डिप्लोमा समुपदेशन व मानसोपचार या दोन्ही पदवी व पदविका अभ्यासक्रमाची आसन क्षमता 100 एवढी असून दहा टक्के वाढीव क्षमतेने 110 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. याबरोबरच एम ए आजीवन अध्ययन व विस्तार या अभ्यासक्रमाची 40 एवढी असून 44 प्रवेश, एम ए छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमाची 40 एवढी असून 44 प्रवेश, एम ए योगशास्त्र अभ्यासक्रमाची 80 एवढी असून 88 प्रवेश, पी जी डिप्लोमा योग थेरपी अभ्यासक्रमाची 40 एवढी असून 44 प्रवेश, पी जी डिप्लोमा कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश अभ्यासक्रमाची 40 एवढी असून 44 प्रवेश, पी जी डिप्लोमा नॅचरोपॅथी अॅन्ड यौगिक सायन्स या अभ्यासक्रमाची 40 एवढी आसन क्षमता असून दहा टक्के वाढीव क्षमतेने 44 प्रवेश पूर्ण झाले आहेत.
अशा कौशल्यपूर्ण व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे विद्यापीठाने निर्धारित करून दिलेल्या विद्यार्थी आसन क्षमतेपेक्षा दहा टक्के प्रवेशाची पूर्तता करून सुद्धा अजूनही वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांची प्रवेशाकरिता मागणी सुरू आहे व याच विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे कुलगुरू यांना पुन्हा 10 टक्के वाढीव क्षमता देण्यात यावी, अशी प्रवेश घेऊ इच्छिणाया विद्यार्थ्यांकडुन मागणी आहे. यावरून आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील अभ्यासक्रमाचे कौशल्ययुक्त व रोजगाराभिमुख असलेले धोरण निश्चित होते.
एवढेच नव्हे तर या विभागातील अभ्यासक्रमासाठी पुढील शैक्षणिक सत्राकरिता काही विद्यार्थ्यांनी आतापासूनच प्रवेश निश्चित केले आहे. या व्यतीरीक्त ज्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षाकरीता विभागामध्ये सुरु असलेल्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावयाचे असतील, त्यांनी आतापासुनच विभागाच्या स्तरावर नोंदणी करावी, असे आवाहन आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ श्रीकांत पाटील यांनी केले आहे.