सहकार महर्षी स्व भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयात ‘संत गुलाबराव महाराजांची समाजाभिमुखता’ या विषयावर व्याख्यान संपन्न
संतांचे समाजाकरीता महान कार्य
विद्यार्थ्यांनी संत गुलाबराव महाराजांवर संशोधन करावे – न्यायमूर्ती सुदाम देशमुख
खामगांव येथील सहकार महर्षी स्व भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयात व्याख्यान
अमरावती : संतांनी सदैव समाजाकरीता कार्य केले आहे. संत गुलाबराव महाराज यांच्या ग्रंथात मनोरंजनाला स्थान नाही. मोक्षपट संत गुलाबराव महाराजांनी सांगितला आहे. खरे तर समाजाकरीता झटणारे नागरिक आज निर्माण झाले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आपली निरीक्षण बुध्दी सदैव जागृत ठेवावी. महाराजांची वैज्ञानिक दृष्टी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संत गुलाबराव महाराज यांच्या जीवनचरित्रावर संशोधक करावे, असे प्रतिपादन माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश सुदाम देशमुख यांनी केले. स्व वासुदेवराव राजारामजी देशमुख यांच्याकडून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला प्राप्त झालेल्या दाननिधीमधून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्रातील खामगांव येथील सहकार महर्षी स्व भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयामध्ये व्याख्यानमालेचे ‘संत गुलाबराव महाराजांची समाजाभिमुखता’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, स्व भास्करराव शिंगणे आरोग्य व शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ सद्गुण देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय पाटील, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर उपस्थित होते.
न्या सुदाम देशमुख पुढे म्हणाले, महाराजांनी योगशास्त्रातून मिळविलेल्या सिध्दीची प्रचिती येण्यासाठी विद्यार्थ्यांनी योगशास्त्राची कास धरावी.आपला पुनर्जन्म आठवावा, एवढी स्मरणशक्ती असली पाहिजे. संत गुलाबराव महाराज यांना पुनर्जन्मातील गोष्टी आठवायच्या. परिस्थिती कशीही असली, तरी त्यावर मात करता आली पाहिजे, असे संत गुलाबराव महाराज सांगतात. महाराज जे सांगायचे त्यात वेदनिष्ठता होती. महाराजांच्या सामर्थ्याचे दर्शन हजारो उदाहरणांमधून घडले आहे. शास्त्राचं पालन करुन सर्वांनी आचरण करावे, असेही न्या देशमुख म्हणाले.
संत गुलाबराव महाराज म्हणायचे, आपल्या शास्त्रात जे जे सांगितले आहे, ते खरे आहे.आपली समाजपध्दती, शिक्षण पध्दती, जीवनपध्दती आज भरकटत चालली आहे. आपल्या समाजाचे शास्त्र आपण अवलंबिले पाहिजे. केवळ पोट भरणे एवढाच विचार जीवन जगतांना नसावा. भक्तीमार्गात कर्मकांड महाराजांना मान्य नव्हते. महाराजांनी उत्क्रांतवादाची पाळेमुळे शोधण्याचा प्रयत्न केला. महाराजांची ग्रंथसंपदा अफाट आहे व जेवढे वाचाल, तेवढे कमीच आहे. विद्यार्थ्यांनी आपली स्मरणशक्ती दांडगी ठेवण्यासाठी बुध्दी आणि मन एकाग्र केले पाहिजे. यश मिळविण्यासाठी विचार, ग्रंथ, ज्ञान याचा यथायोग्य वापर करा. महाराजांची क्षमता आणि सामर्थ्य प्रचंड होतं. आंधळे असूनही महाराजांची ग्रंथसंपदा अफाट आहे, असे सांगून महाराजांनी समाज उपयोगी अनेक बाबी सांगितल्या आहेत, लिहून ठेवल्या आहेत, त्या विद्याथ्र्यांनी अंमलात आणाव्यात, असेही न्या. देशमुख यांनी सांगितले.
संतांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावेत हाच व्याख्यानमालेचा उद्देश – प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे
अध्यक्षीय भाषण करतांना प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे म्हणाले, विद्यापीठाच्यावतीने पाचही जिल्ह्रांत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यामागचा उद्देश संतांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावेत, हा आहे. संत गुलाबराव महाराजांचे व्यक्तिमत्व, त्यांच्या अल्पशा आयुष्यामध्ये त्यांनी लिहिलेली प्रचंड ग्रंथसंपदा, त्यांचा आदर्श न्या सुदाम देशमुख यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून मांडला आहे. अतिशय विवेकशील विचार व्याख्यात्यांनी विद्याथ्र्यांना दिलेत. दृष्टिहीन असतांनाही संत गुलाबराव महाराजांनी समाजाला दिशा देणारी ग्रंथसंपदा निर्माण केली, यावरुन महाराजांची समाजसुधारणेची व्यापक दृष्टीही दिसून येते. विद्यार्थ्यांनी संत गुलाबराव महाराजांच्या साहित्याचे वाचन करुन त्यांचे विचार आपल्या जीवनात अंमलात आणावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले.
महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन, पुष्पार्पण व दीपप्रज्वलन करुन राष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांचा शॉल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकातून विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांनी व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला. संचालन प्रा अलका काळणे यांनी, तर आभार प्राचार्य डॉ संजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, श्री संत गुलाबराव महाराज संस्थेचे सचिव विनय देशमुख व राजाभाऊ देशमुख, गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता स्वीटी बोचरे हिने गायलेल्या पसायदानाने झाली.