वन्यजीव सप्ताहनिमित्त नागपूर विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात व्याख्यान संपन्न
पर्यावरण संतुलनात वन्यजीवांची महत्त्वपूर्ण भूमिका – मुख्य वनसंरक्षक डॉ किशोर मानकर
नागपूर : पर्यावरणाचे संतुलन राखण्यात वन्यजीवांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्य वनसंरक्षक डॉ किशोर मानकर (आयएफएस) यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागात वन्यजीव सप्ताह निमित्त शुक्रवार, दिनांक ४ ऑक्टोंबर २०२४ रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी डॉ मानकर मार्गदर्शन करीत होते.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ व्ही टी धुर्वे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून मुख्य वनसंरक्षक डॉ किशोर मानकर (आयएफएस), राज्य रेशीम संचालनालयातील उपसंचालक महेंद्र ढवळे यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना डॉ मानकर यांनी संघराज्य लोकसेवा आयोग परीक्षा (यूपीएससी) आणि विशेषत: भारतीय वन सेवा (आयएफएस) परीक्षेबाबत माहिती दिली.
त्यांनी त्यांच्या भाषणातून वन्यजीवांचे संरक्षण तसेच संवर्धन करण्याबाबत माहिती दिली. डॉ मानकर यांनी वन्यजीवांचे जैवविविधतेतील योगदान आणि शेतीवर त्यांच्या प्रभावाबद्दल पुढे बोलताना चर्चा केली. भारतीय संविधानाच्या कलम ५१ वर लक्ष केंद्रित करून त्यांनी नागरिकांच्या वन्यजीव संवर्धनातील जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या. विविध वन्यजीव संरक्षण कायद्यांचा आढावा घेताना त्यांनी संकटात असलेल्या प्रजातींना आणि त्यांच्या आवासांचे संरक्षण करण्याची आवश्यकता व्यक्त केली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देत वन्यजीव संरक्षणाच्या व्यावहारिक उपाययोजना आणि जनजागृतीच्या महत्त्वावर चर्चासत्र चालवले.
डॉ मानकर यांच्या व्याख्यानानंतर रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी रेशीम शेती बाबत संपूर्ण माहिती दिली. रेशीम किड्याच्या जीवनचक्राचा उल्लेख विशेषतः केला. त्यांनी मलबरी झाडांच्या लागवडीपासून कच्च्या रेशमाच्या तंतुंच्या काढणीपर्यंतची प्रक्रिया स्पष्ट केली. रेशीम शेतीला शाश्वत उत्पन्न स्रोत म्हणून कृषकांच्या विविध केस स्टडीजची उदाहरणे दिली. त्यांनी रेशीम उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठीच्या संधीचा उल्लेख केला. भारतातील रेशीम उत्पादनाच्या जागतिक स्थितीचा सखोल अभ्यास करताना त्यांनी रेशीम उत्पादनात देशाच्या समृद्ध वारसाबद्दल आणि त्याच्या संवर्धनासाठी चालू असलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.
डॉ आशिककुमार नागवंशी यांनी अतिथींना परिचय करून दिला. तर विभाग प्रमुख डॉ व्हि टी धुर्वे यांनी अतिथींना सन्मानित केले. या वेळी प्रा डॉ एस सी मास्राम उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप पवन चांका यांनी आभार उच्च मानून केला.