दत्ताजीराव कदम कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ‘विवेक’ अंकाचा प्रकाशन समारंभ संपन्न
इचलकरंजी : साहित्य निर्माण करणारा साहित्यिक आणि त्याचा आस्वाद घेणारा रसिक ही माणसे कधीही नैराश्यातून टोकाची भूमिका घेत नाहीत, साहित्यावरील श्रद्धा आणि साहित्याची गोडी आपल्याला जगण्याच्या कोणत्याही वळणावर उभे राहण्याची प्रेरणा देतात. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, संत साहित्याचे अभ्यासक प्रा. राजा माळगी यांनी केले. येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स ॲण्ड कॉमर्स महाविद्यालयातील वाङ्मय मंडळाचे उद्घाटन आणि ‘विवेक’ वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन अशा संयुक्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संस्था प्रार्थना व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रा.माळगी आपल्या भाषणात पुढे म्हणाले, “दारातल्या रांगोळीवरून घराचे घरपण आणि संस्कार कळतात त्याप्रमाणे महाविद्यालयाचे वार्षिक नियतकालिक महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांचा,गौरवशाली परंपरेचा आणि संस्कारांचा दस्तऐवज असते .अशा नियतकालिकांमुळेच विद्यार्थ्यांमध्ये साहित्य लेखनाची रुची निर्माण होते. वाङ्मय आणि साहित्यरुची माणसाची बौद्धिक आणि मानसिक गरज आहे. त्यामुळे स्वतःमधील आस्वादकता, रसिकता वाढवा. बुद्धीवादाला संवेदनशीलतेची जोड मिळाली की माणूस म्हणून समृद्ध होता येते.” असे मार्गदर्शन करीत महाविद्यालयाच्या ‘विवेक’ नियतकालिकाचे आणि वाङ्मय मंडळाचे त्यांनी कौतुक केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये म्हणाले, “शाश्वत आनंद देण्याचे सामर्थ्य फक्त साहित्यामध्ये आहे. आपली भाषा, संस्कृती आपण जतन केली पाहिजे”. समारंभात स्वागत व पाहुण्यांचा परिचय प्रा. संजय सुतार यांनी करून दिला तर प्रास्ताविक डॉ. प्रभा पाटील यांनी केले. यावेळी प्रा. विश्वंभर कुलकर्णी, प्रा. रोहित शिंगे यांनी मनोगते व्यक्त केली. संजीवनी कदम, प्रियांका भाटले, अवंतिका खराडे या विद्यार्थिनींनी आपल्या कविता सादर केल्या. महाविद्यालयाचे सकाळ सत्र प्रमुख डॉ.डी.सी कांबळे, दुपार सत्र प्रमुख प्रा. डी. ए यादव यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. सुनिता वेल्हाळ यांनी आभार मानले. तर सूत्रसंचालन डॉ. अंजली उबाळे आणि प्रा. अर्चना नंदगावे यांनी केले.