मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींमध्ये सोलापूर विद्यापीठाच्या सायबर वॉरियर्सनी केली सायबर सुरक्षिततेची जनजागृती
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबविला जात आहे. विद्यापीठाच्या संगणक शास्त्र संकुलातील सायबर वॉरियर्स कांचन निकंबे व सई आवताडे या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्यानंतर जाणाऱ्या महिलांना सायबर सुरक्षिततेची महिती दिली.
मुख्यमंत्री – लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा मंगळवार दिनांक ८/१०/२४ रोजी होम मैदान, सोलापूर येथे पार पडला. सोहळा संपन्न झाल्यानंतर कार्यक्रमांतून जाणाऱ्या महिलांना निकंबे व अवताडे या दोघींनी सायबर गुन्हेगारी काय असते तसेच त्यापासून स्वतःचा व परिवाराचा कसा बचाव करावा या विषयावर माहिती दिली. बँकेतून कर्मचारी बोलतोय म्हणून असा कॉल करून कोणी बँकेची महिती मागितल्यास माहिती न देणे, थोडक्यात कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली खासगी महिती न सांगणे, कोणताहि ओ टी पी शेअर करू नये, कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करू नये अशी माहिती सई यांनी दिली.
पब्लिक वायफाय चा वापर टाळावा, आपले पासवर्ड मजबूत ठेवावे, सोशल मीडियावरती आपली खासगी माहिती शेअर करू नये, तसेच आपल्या अकाउंटला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू करावे असा संदेश कांचन यांनी दिला. मोबाईल मधल्या आवश्यक सेटिंग्ज त्यांनी महिलांना समजावून सांगीतल्या.
कोणता सायबर गुन्हा आपल्या सोबत घडल्यास 1930 या हेल्पलाईन नंबर वर कॉल करून किंवा “cybercrime.gov.in” या वेबसाईट वरून आपली तक्रार नोंद करावी अशी माहिती सई यांनी दिली. अश्या तऱ्हेने कार्यक्रमातून जाणाऱ्या महिलांना थांबवून या दोघी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती केली व सुरक्षिततेची शपथ त्यांना दिली.