विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निर्देशानुसार मुक्त विद्यापीठातर्फे सायबर सुरक्षा अभ्यासक्रम  

नाशिक  : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युनिवर्सिटी ग्रांट कमिशन –  युजीसी) निर्देशानुसार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘सायबर सुरक्षा’ ( सायबर सेक्युरिटी – Cyber Security)  हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षतेबद्दल जागरूकता वाढणे, त्यांनी तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर करण्यास शिकणे आणि भारतासह जगभरात वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांपासून त्यांचा बचाव होणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) सायबर जागरूकता दिवस (दिनांक ६ ऑक्टोबर) च्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर २०२२ मध्ये देशभरातील सर्व विद्यापीठांना ‘सायबर सुरक्षा अभ्यासक्रमाची’ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे सर्व पदवी आणि पदव्युतर शिक्षणक्रमास प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्याना ‘सायबर सुरक्षा’ हा अभ्यासक्रम लागू करण्यात आलेला आहे. बी.सी.ए. सारख्या शिक्षणक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल. हा अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निर्देशानुसार सुरु करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे त्यासाठीचे अभ्यासक्रम – अध्ययन साहित्य हे विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वत: विकसित करून उपलब्ध करून दिलेले आहे. यासाठी गेल्या सप्टेंबर महिन्यात विद्यापीठाच्या विद्वत परिषदेची (अकॅडेमिक कौन्सिल) विशेष बैठक होवून त्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

Advertisement

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने निश्चित केल्यानुसार सदर ‘सायबर सुरक्षा’ अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ पासून विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. तो मराठी व इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाच्या वायसीएमओयु स्टुडंट ॲपद्वारे (YCMOU Student App)  देखील प्रवेश घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा कालावधी हा पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षे तर पदव्युत्तरसाठी दोन वर्षे इतका आहे. याची परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. सदर अभ्यासक्रमासाठी एकदाच पाचशे रुपये एवढे शुल्क भरायचे आहे. त्यानंतर या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विद्यार्थी प्रथम प्रयत्नात यशस्वी झाला नाही तरी त्यासाठी त्याचा प्रवेश ग्राह्य राहील व तो विद्यार्थी ती परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत त्याच्याकडून नंतर याबाबत इतर कुठलेही शुल्क घेतले जाणार नाही.

‘सायबर सुरक्षा’ अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यास त्याचे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मात्र सदरची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यास त्याच्या मूळ शिक्षणक्रम पदवी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपली पदवी / पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्यासाठी हा ‘सायबर सुरक्षा’ अभ्यासक्रम विहित वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. सदर अभ्यासक्रम प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मोबाईल ॲपद्वारे नावनोंदणी करावी लागेल. त्यासाठीची अँड्रॉइड लिंक (Android – https://play.google.com/store/apps/details?id=org.mkcl.ycmoudu ) व आयओएस लिंक (IOS – https://apps.apple.com/in/app/ycmou-student/id6475083272 ) देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट द्यावी असे आवाहन विद्यापीठाच्या संगणक शास्त्र विद्याशाखेचे संचालक प्रा. माधव पळशीकर यांनी केले आहे.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page