वुमेन्स स्टडीज सेंटरद्वारे मुलींसाठी सायबर सुरक्षा जाणीवजागृती कार्यशाळा संपन्न

सायबर सुरक्षा लक्षात घेवून व्यवहार अधिक काळजीपूर्वक करावे – ममेश माथनकर

अमरावती : आधुनिक युगात संगणक क्रांती झालेली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून मानवाचे जीवन अधिक सोयीचे झाले आहे. परंतु इंटरनेटचा जेवढा अधिक वापर वाढत गेला, तसतसे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली. सायबर गुन्ह्यांच्या अंतर्गत आर्थिक फसवणूक तर होवूच लागली, तशीच मानवाच्या प्रतिष्ठतेला सुद्धा हाणी पोहचवल्या जावू लागली आहे. त्यादृष्टीने सायबर सुरक्षा लक्षात घेवून व्यवहार अधिक काळजीपूर्वक करावे, असे प्रतिपादन तज्ज्ञ मार्गदर्शक ममेश माथनकर यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरद्वारे संशोधन प्रकल्पाच्या अंतर्गत विद्यापीठातील ज्ञान स्त्रोत केंद्राच्या सेमिनार हॉल येथे ‘सायबर सुरक्षा : जाणीवजागृती’ याविषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून वुमेन्स स्टडीज सेंटरच्या संचालक डॉ वैशाली गुडधे उपस्थित होत्या.

ममेश माथनकर यांनी सायबर गुन्ह्यांची संकल्पना सांगितली. सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार असून त्याद्वारे होणारी फसवणूक सांगितली. यामध्ये त्यांनी हॅकिंग, फिशिंग, Identity Theft, सोशल इंजिनीअरिंग, फेक कस्टमर केअर नंबर, फेक whatsapp डीपी, हनी ट्रॅप, फेक पोलीस फसवणूक, फेक फिंगरप्रिंट/आधार, सायबर ग्रुमिंग, सायबर बुलिंग, मॉर्फिंग, सायबर डिफेमेशन, सायबर स्टॉकिंग, व्हाईस क्लोनिंग फसवणूक, फेस क्लोनिंग फसवणूक, OLX फसवणुकीविषयी अशा विविध सायबर गुन्ह्याविषयी सांगून हे गुन्हे कशाप्रकारे घडतात याबद्दल विस्तृत विवेचन केले. सायबर गुन्हा घडल्यावर कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी तसेच सायबर गुन्ह्या विरुद्ध तक्रार कुठे व कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. सायबर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून थांबा, विचार करा आणि नंतर कृती करा अशा त्रीसुत्रीचा संदेश त्यांनी सर्वाना दिला.

Advertisement

अध्यक्षीय मनोगतात डॉ वैशाली गुडधे म्हणाल्या, सायबर गुन्हे हे सध्या आपल्या आजूबाजूच्या परिसरात घडताना दिसून येत आहे. यामध्ये महिलांप्रमाणे लहान मुले व पुरुष सुद्धा अधिक प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे सर्वानी सायबर गुन्ह्यांच्या बाबत अधिक सतर्कतेने काळजी घ्यावी. कार्यशाळेतील सायबर सुरक्षेबाबत असणारी सर्व माहिती केवळ स्वत: पुरती मर्यादित न ठेवता आपापल्या कुटुंबात, महाविद्यालय आणि समाजातील इतर घटकांपर्यंत पोहचविण्यात येण्याचे आवाहन केले.

वुमेन्स स्टडीज सेंटरला WRC-ICSSR मुंबई यांच्याद्वारे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी Minor Research Project अंतर्गत प्रायोगिक पद्धतीचा उपयोग करण्याच्या दृष्टीने प्रायोगिक कार्यक्रम घ्यायचे होते. सदर कार्यशाळा त्यानुसारच घेण्यात आली. या कार्यशाळेत उपस्थित सर्व मुलींकडून सायबर सुरक्षा जाणीवजागृतीबाबत एक पूर्व चाचणी, उत्तर चाचणी आणि प्रश्नावली भरून घेण्यात आली. ममेश माथनकर यांनी सायबर सुरक्षा जाणीव जागृतीविषयक मार्गदर्शन केले.

सायबर सुरक्षा जाणीवजागृतीबाबत तुलनात्मक अभ्यास करून संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. अमरावती शहराप्रमाणेच अमरावती जिल्ह्यातील तालुकानिहाय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. यामध्ये चिखलदरा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, अचलपूर आणि अंजनगाव सुर्जी इ तालुक्यांच्या समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वुमेन्स स्टडीज सेंटरचे प्रकल्प सहायक डॉ वैभव अर्मळ यांनी, संचालन अनुराग मेश्राम व आभार प्रदर्शन मनीषा वानखडे यांनी केले. कार्यशाळेला विद्यार्थीनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व महिला प्राध्यापक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page