राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सांस्कृतिक युवक महोत्सव ‘युवारंगा’त रंगली तरुणाई

आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवक महोत्सवात विद्यार्थ्यांकडून कलांचे सादरीकरण

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवक महोत्सवात विद्यार्थ्यांकडून कलागुणांची उधळण केली जात आहे. गुरुनानक भवन, ललित कला विभाग तसेच जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात आयोजित विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचे कलागुण सादर केले.

युवारंगच्या दुसऱ्या दिवशी लघु नाटिका, मुकनाट्य, मिमिक्री, पाश्चात्य संगीत, प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा तसेच ललित कला प्रकारातील विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटनीय कार्यक्रमाला अधिसभा सदस्य दिनेश शेराम, डॉ किशोर इंगळे, शुभांगी नक्षीने, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ विजय खंडाळ, ललित कला विभाग प्रमुख डॉ संयुक्ता थोरात, नितीन मरसकोल्हे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी अधिसभा सदस्य दिनेश शेराम, डॉ किशोर इंगळे व शुभांगी नक्षीने यांनी स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

‘स्त्रीवादाची गरज नाही’ विषयावर रंगला वादविवाद

Advertisement

जमनालाल बजाज भवनातील सभागृहात “आजच्या काळात स्त्रीवादाची गरज नाही” या विषयावर वादविवाद स्पर्धा झाली. वादविवाद स्पर्धेत ६७ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होत उत्कृष्ट वादविवाद केला. “आजच्या काळात स्त्रीवादाची गरज नाही” विषयाच्या समर्थनार्थ बाजू मांडताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे उदाहरण दिले. स्त्रियांना आता व्यवसायाची संधी दिल्या जात आहे. आजच्या काळात स्त्रीवादीचा गैरवापर आपल्याला दिसत आहे.

विरोधकांनी महिला सुरक्षेवर भाष्य केले. राजस्थान आणि झारखंड सारख्या राज्यामध्ये अद्यापही बाल विवाह तसेच घरगुती हिंसाचार बंद झालेला नसल्याचे सांगितले. सोबतच प्रश्नमंजुषेच्या स्पर्धेत ६० पेक्षा अधिक महाविद्यालयांनी सहभाग घेतला. प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयाच्या प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेकरिता तीस मिनिटांचा वेळ दिला असून स्पर्धकांना ३० प्रश्न सोडविणे आवश्यक होते.

नाट्य प्रकारातून मांडले सामाजिक वास्तव

विद्यार्थ्यांनी लघु नाटिका (स्किट) मूकनाट्य (माईम) तसेच मिमिक्री या नाट्य प्रकारातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. मानसिक ताणतणाव, मोबाईलचे जीवघेणे व्यसन, डिटेक्टिव्ह, कौटुंबिक हिंसाचार आदी विविध ज्वलंत सामाजिक विषयांना घेऊन या नाट्य प्रकारातून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली.

कुंचल्यावर उमटले राजकीय रंग

ललित कला प्रकारातील पेंटिंग, पोस्टर मेकिंग, क्ले मॉडलिंग, व्यंगचित्र, कोलाज, मेहंदी, रांगोळी आदी स्पर्धा ललित कला विभागात पार पडल्या. विद्यार्थ्यांनी पोस्टर मेकिंग तसेच व्यंगचित्र प्रकारात राजकीय व्यंग साकारले. त्याचप्रमाणे देशातील संस्कृतीची ओळख दर्शविणारे चित्र साकारले. निसर्ग चित्र, भारताची विविध क्षेत्रातील प्रगती त्याचप्रमाणे विविध सामाजिक विषयांना वाचा फोडणारे साहित्य विद्यार्थ्यांनी सादर केले.

संगीत कलाकृतींनी श्रोते मंत्रमुग्ध

युवक महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सुगम संगीत शास्त्रीय संगीत समूहगीत स्पर्धा शास्त्रीय ताल तान वाद्य स्पर्धा आदी विविध स्पर्धा पार पडल्या. त्याचप्रमाणे आज दुसऱ्या दिवशी पाश्चात्य संगीत स्पर्धा पार पडली. या संगीत स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृतींनी श्रोते मंत्रमुग्ध झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page