किडनी स्टोन आजारावरील उपयुक्त ‘क्रश कॅप्सुल’ कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे हस्ते लाँच

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. अनिता पाटील यांच्या किडनी स्टोनवरील पेटेन्टचे नागपूर येथील बुटीबोरी भागातील अॅप्रोप्रिएट आयुर्वेदा कंपनीने क्रश कॅप्सूल स्वरुपात प्रोडक्ट उपलब्ध करुन दिल्यामुळे किडनी स्टोनच्या पेशन्टला नवी संजीवनी मिळाली असून, आजारमुक्त होण्यास निश्चितच फायदा होईल, असे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. क्रश कॅप्सूल लाँचप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, अॅप्रोप्रिएट डायट थेरपीचे संचालक डॉ. एस. कुमार, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, अॅप्रोप्रिएट आयुर्वेदाचे संचालक डॉ. भाग्यश्री, पेटेन्ट प्राप्तकर्ता डॉ. अनिता पाटील, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान, नागपूरच्या संशोधन सल्लागार डॉ. प्रगती गोखले, उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील आदी उपस्थित होते.

Advertisement

किडनी स्टोनवरील क्रश कॅप्सूल लाँच केल्यानंतर कुलगुरू पुढे म्हणाले, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान, मुंबईच्या सहकार्याने विद्यापीठातील डॉ. अनिता पाटील यांनी संशोधनावर मिळविलेल्या पेटेन्टचे डॉ.एस. कुमार यांच्या कंपनीतील रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेन्टद्वारे प्रोडक्टमध्ये रुपांतर करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये अमरावती विद्यापीठ पहिले आहे, त्या विद्यापीठातील संशोधनाचे प्रोडक्टमध्ये रुपांतर झाले, याचा मला कुलगुरू म्हणून अभिमान आहे. याप्रसंगी त्यांनी डॉ. अनिता पाटील यांचे अभिनंदन केले आणि विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी समाजोपयोगी निरंतर संशोधन करुन त्याचा फायदा समाजाला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

आर.जी.एस.टी.सी., मुंबईचे संचालक तथा शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, विद्यापीठाच्या पेटेन्टचे व्यावसायिक रुपांतर झाल्याचा मला आनंद वाटतो. यापुढे आणखी संशोधन होवून अशाप्रकारचे अनेक प्रोजेक्टस मार्केटमध्ये यायला हवे. डॉ. अनिता पाटील यांच्या यशाबद्दल त्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्यात. डॉ.एस. कुमार म्हणाले, किडनी स्टोनवर यापूर्वी सर्जरी केली जायची, परंतू आता सर्जरीपासून बचाव करण्यासाठी डॉ. अनिता पाटील यांनी क्रश कॅप्सूलचे संशोधन केले. त्यांच्या पेटेन्टचे व्यावसायिकरण आमच्या कंपनीद्वारे होत आहे, आणि त्याचा फायदा किडनी स्टोनच्या पेशन्टला होईल, याचा मला निश्चितच आनंद वाटतो. नव्वद दिवसांत कितीही मोठा स्टोन असला, तरी तो गळून पडेल आणि रोगी किडनी स्टोनपासून मुक्तता मिळवू शकेल. क्रश कॅप्सूल संजीवनी बुटीचे काम करीत आहे. ज्यांना किडनी स्टोन आहे, त्यांनी या क्रश कॅप्सूलचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर यांनी आयुर्वेदिक औषधीचे वर्तमानकाळातील महत्व विशद करुन विविध दुर्धर आजारावर मात करण्यासाठी याचा फायदा होतो, असे सांगितले. डॉ. प्रगती गोखले यांनी किडनी स्टोनवरील संशोधनाचे व्यावसायिक यश हेच आर.जी.एस.टी.सी., मुंबईचे ध्येयाचे फलीत असल्याचे सांगून लोकोपयोगी उत्कृष्ट संशोधनाला नेहमीच पाठींबा असल्याचे सांगितले.

डॉ. अनिता पाटील यांनी या संशोधन करतांना आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात, एकूणच क्रश कॅप्सूलला व्यावसायिक स्वरुप कसे प्राप्त झाले आणि या औषधीचा किडनी स्टोन विरघळण्यासाठी कशा पद्धतीने उपयोग होतो, प्रयोगशाळेत त्यांनी केलेले संशोधन आदींची माहिती देवून त्यांना या कार्यामध्ये ज्यांनी सहकार्य केले, त्यांच्याप्रती ऋण व्यक्त केले. नागपूर येथील बुटीबोरी भागात झालेल्या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम कोनशिलाचे अनावरण करण्यात आले. दीपप्रज्वलन व महापुरुषांना माल्यार्पण करुन उपस्थितांचे स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी डॉ. भाग्यश्री यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील यांनी केले. कार्यक्रमाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, डॉ. सुरेंद्र पाटील, डॉ. सुरेंद्र माणिक, डॉ. अंकित काळे, गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ. वैशाली धनविजय यांचेसह अॅप्रोप्रिएट आयुर्वेदा कंपनीचे पदाधिकारी, नागरिक तसेच पत्रकार मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page