सर्जनशील लेखक समाज जीवनाचा भाष्यकार – डॉ रवींद्र शोभणे
नागपूर : सर्जनशील लेखक समाज जीवनाचा भाष्यकार असतो, असे प्रतिपादन ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागात मराठीतील ज्येष्ठ कथाकार व कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांचे ‘सर्जनशील साहित्याची निर्मिती’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. शोभणे मार्गदर्शन करीत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव्य विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी होते. इंग्रजी विभाग प्रमुख डॉ संजय पळवेकर व राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ विकास जांभूळकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. रवींद्र शोभणे यांची अंमळनेर येथे होऊ घातलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने मराठी विभागातर्फे भावपूर्ण सत्कार करण्यात आला. अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांच्या हस्ते व मराठी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. संजय पळवेकर, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. विकास जांभुळकर, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. अशोक बोरकर, तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. धीरज कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार व समीक्षक डॉ. रवींद्र शोभणे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.
डॉ. रवींद्र शोभणे यांनी ‘सर्जनशील साहित्याची निर्मिती’ या विषयावरील व्याख्यानामधून मराठीतील सर्जनशील साहित्याची निर्मितिप्रक्रिया सविस्तर स्वरूपात उलगडून दाखवली. मराठीतील विविध कथांची व कादंबरीकृतींची वैशिष्ट्यपूर्णता त्यांनी याप्रसंगी विशद केली. लेखकाचे समाज जीवनविषयक ज्ञान जितके समृद्ध असेल, तितके त्याचे कथनपर लेखन हे सकस रूप धारण करत असते. लेखकाच्या अनुभवविश्वाची समृद्धी ही अंतिमतः त्याच्या लेखनाला समृद्धी बहाल करत असते. मराठी साहित्यातील नामवंत कथाकारांचे व कादंबरीकारांचे लेखन हे मराठी समाजाचे जीवनविषयक भान व्यापक करणारे ठरल्याचे प्रतिपादन त्यांनी आपल्या व्याख्यानातून केले. मराठीतील सर्जनशील साहित्याचे आशयतत्व आणि अभिव्यक्तीरूप त्यांनी विविध कलाकृतींच्या उदाहरणांसह सुस्पष्ट करून दाखवले. सर्जनशील लेखक समाजजीवनातील नाना प्रकारच्या प्रश्नांच्या उत्तराचा शोध साहित्यिक पातळीवरून घेत असतो, या प्रकारची मांडणी डॉ. रवींद्र शोभणे यांनी आपल्या व्याख्यानातून केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी मराठी साहित्य आणि सामाजिक शास्त्रे यांच्यातील परस्परसंबंधावर विचार व्यक्त केले. डॉ रवींद्र शोभणे यांचे साहित्य मराठी साहित्यविश्वाला समृद्ध करणारे असल्याचे विचार त्यांनी आपल्या भाषणातून मांडले. इंग्रजी विभागप्रमुख डॉ. संजय पळवेकर यांनी डॉ. रवींद्र शोभणे यांचे साहित्य विदर्भातील लोकांसाठी अभिमानाचा विषय असल्याचे प्रतिपादन केले. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास जांभुळकर यांनी भाषा आणि राजकारण यांचातील अनुबंध उलगडून दाखवला.
या व्याख्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत मराठी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी व्यक्त केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी सद्यस्थितीमधील सर्जनशील साहित्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच त्यांनी अतिथी वक्ता व सत्कारमूर्ती डॉ. रवींद्र शोभणे यांचे साहित्यिक योगदान उलगडून दाखवले. या व्याख्यान व सत्कार कार्यक्रमाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मानव्य विज्ञान विद्याशाखेतील विविध विषयांचे विभाग प्रमुख व प्राध्यापक तसेच मराठी विभागातील विद्यार्थी व संशोधक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये प्रा. सुजित जाधव, प्रा. सपन नेहरोत्रा यांच्यासह विविध मराठी विषयाचे प्राध्यापक लक्षणीय संख्येने उपस्थित होते. संचालन प्रा. अमित दुर्योधन यांनी केले तर आभार डॉ. अमृता इंदूरकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी मराठी विभागातील प्राध्यापक हर्षल गेडाम, उमेश डोंगरवार, विभागातील संशोधक समीर कुमरे यांनी विशेष परिश्रम घेतले.