राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर लोकप्रशासन विभागात संविधान दिवस साजरा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर लोक प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य विभागात शनिवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिवस कार्यक्रम पार पडला. यानिमित्ताने अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले.

यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षस्थान मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी यांनी भूषविले. प्रमुख वक्ते म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास जांभुळकर, पदव्युत्तर विधी विभाग प्रमुख डॉ पायल ठावरे तर कार्यक्रमाचे आयोजक लोकप्रशासन आणि स्थानिक स्वराज्य विभाग प्रमुख डॉ जितेंद्र वासनीक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. प्रास्ताविकेचे वाचन रमण शिवांकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ जितेंद्र वासनीक यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व सांगितले. संविधान हे एक संवादात्मक दस्तऐवज असून त्याची योग्य समज आणि अंमलबजावणी आवश्यक आहे. जेणेकरून भारताच्या प्रगतीशील विकासाच्या बाबी सुकर होतील, असे डॉ वासनीक म्हणाले. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ विकास जांभुळकर यांनी संविधानातील राज्य धोरणाच्या निर्देशक तत्त्वांचे महत्त्व सांगितले. या तत्त्वांची जनतेत जागरूकता वाढवली पाहिजे. त्यामुळे एक न्याय्य आणि समान समाज निर्माण होईल. एक प्रभावी सार्वजनिक धोरण तयार करण्याचा मार्ग सुकर होईल. न्यायिकदृष्ट्या सक्षम, प्रशासनिकदृष्ट्या योग्य, सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असेल, डॉ जांभुळकर म्हणाले.
पदव्युत्तर विधी विभाग प्रमुख डॉ पायल ठावरे यांनी लिंगभेदाचे मुद्दे विस्ताराने मांडले. त्यांनी संविधानातील अनुच्छेद १४, १५, १६, २१ आणि २५ यांचा उल्लेख करून प्रत्येक व्यक्तीच्या समस्यांचे महत्त्व स्पष्ट केले. त्यात महिलांचा, मुलांचा, पुरुषांचा, तृतीयपंथींचा आणि इतर घटकांचा समावेश आहे. या सर्व घटकांना योग्य समाधान देणे हे संविधान निर्मात्याला खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.
अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी यांच्या अध्यक्षीय भाषणात शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या विविधतेला जोडण्याचे महत्त्व सांगितले. आदिवासी लोक जे राज्य धोरणाचे निर्देशक तत्त्व त्यांच्या जीवनशैलीत अंमलात आणतात. त्यांच्याकडून शहरी लोकांनी शिकलं पाहिजे, जेणेकरून शाश्वत जीवनशैलीचा आदानप्रदान होईल, असे डॉ कोरेटी म्हणाले. संविधान एक जिवंत दस्तऐवज आहे, आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी त्याला खुले आणि रचनात्मक दृष्टिकोन देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना अतिथींनी उत्तर दिली.
कार्यक्रमाचे संचालन श्रीवर्धन केकाटपुरे यांनी केले तर प्रदर्शन हितेश्री दंभरे यांनी मानले. कार्यक्रमालाच्या यशस्वीरेसाठी डॉ सुप्रिया डेव्हिड, डॉ धर्मेंद्र तुर्कर, अंकुश मिरथे आणि कार्यालयीन कर्मचारी संदीप बोरकर यांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले.