नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचीन भारतीय वनऔषधी संवर्धनावर मंथन
ऑरा संवर्धन पार्क येथे कार्यशाळेचे आयोजन
नागपूर : भारतीय प्राचीन वनऔषधीची लागवड, संवर्धन तसेच जागरूकता निर्माण व्हावी म्हणून तीन दिवसीय कार्यशाळा कोंढाळी येथील ऑरा संवर्धन पार्क येथे पार पडली. प्राचीन वनऔषधींचे गुणधर्म आणि महत्व देशाच्या विविध भागातील ४० तज्ञांनी कार्यशाळेत सहभागी होत जाणून घेतले. अखिल भारतीय पारंपरिक औषधी वैद्य महासंघ, आयुर्वान फाऊंडेशन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा औषधी निर्माणशास्त्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
नागपूरच्या कोंढाळीतील ऑरा संवर्धन पार्कमध्ये ८०० पेक्षा अधिक औषधी वनस्पतींच्या लागवडी, संवर्धन आणि जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या कार्यशाळेतून करण्यात आले. प्राचीन वनऔषधी ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचे मिश्रण असलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश आयुर्वेदाबद्दल जागरूकता वाढवणे आणि दुर्मिळ व धोक्यात असलेल्या औषधी वनस्पतींच्या प्रजातींच्या वाढीस प्रोत्साहन देणे हा होता. पारंपरिक वन औषध महासंघाचे अनिलभाई पटेल, राजेंद्र डेकट आणि त्यांच्या चमूने पारंपरिक वन औषधांचे संरक्षण आणि पुनरुत्थान करण्याची तातडीची गरज व्यक्त केली.
या कार्यशाळेत देशभरातील ४० प्रसिद्ध औषधी निर्माण शास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. त्यांनी चर्चासत्रात आपल्या विचारांची देवाणघेवाण केली. अखिल भारतीय पारंपरिक औषधी वैद्य महासंघ महाराष्ट्र सरकारच्या कायदा क्र १८६०, निती आयोग, भारत सरकारच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय आणि भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायू बदल मंत्रालयात नोंदणीकृत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील डॉ प्रकाश ईटणकर यांनी या औषधी वनस्पतींचे संरक्षण किती महत्त्वाचे आहे आणि त्या आधुनिक आरोग्यसेवेत कशा प्रकारे योगदान देऊ शकतात याबाबत शास्त्रीय माहिती दिली. त्यांच्या मुख्य भाषणाने कार्यशाळेत विशेष लक्ष वेधले गेले. डॉ इटनकर यांनी पारंपरिक ज्ञानाला शास्त्रीय दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला. डॉ जे एन पुरोहित यांनी “नाडी ज्ञान” या विषयावर आपले विचार व्यक्त केले.
मध्य प्रदेशातील वैद्य निर्मल भृगु व वैद्य शंकरलाल राजपूत, हरियाणामधील वैद्य बालकृष्ण ठाकूर, उत्तराखंड मधील वैद्य महेश कुशवाहा, ओडिशातील वैद्य देवानंद साहू, गुजरातमधील वैद्य प्रफुल पटेल, उत्तर प्रदेशातील वैद्य नवीनचंद्र नायडा आणि एनसीआरचे अध्यक्ष हरीश खटाना यांनी औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींच्या धोक्यात असलेल्या प्रजातींबद्दल विचारांची देवाणघेवाण केली आणि त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले.
औषधी वनस्पतींच्या संवर्धन आणि लागवडीत महत्त्वाची भूमिका बजावणारे अम्ब्रिश घटाटे हे ऑरा पार्कमध्ये ८०० हून अधिक औषधी प्रजातींची लागवड आणि उत्पादन करण्याच्या उपक्रम राबवित आहे. भारताच्या विविध भागांतून गोळि केलेल्या मूल्यवान वनस्पती प्रजातींच्या संवर्धनात त्यांचे काम महत्त्वाचे ठरले आहे. ही कार्यशाळा आयुर्वेदाचा समृद्ध वारसा पुनरुत्थान करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले. प्राचीन काळापासून चालत आलेल्या वन औषधींचा गुणधर्म आणि ज्ञानाने पुढील पिढ्या लाभ घेऊ शकतील असा आशावाद कार्यशाळेत उपस्थित तज्ञांनी व्यक्त केला. आयुर्वेदाला एक शाश्वत आणि आरोग्य सेवा व्यवस्थेचा एक अविभाज्य घटक बनविण्यासाठी पुढील प्रयत्न करण्यासाठी एकत्र येण्याचे वचन यावेळी सर्वांनी दिले.