गोंडवाना विद्यापीठातंर्गत 7 एप्रिल रोजी राज्यस्तरीय पात्रता (सेट) परीक्षेचे आयोजन
गडचिरोली : सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या वतीने राज्यस्तरीय पात्रता चाचणी परीक्षेचे (सेट) आयोजन रविवार, दि 7 एप्रिल 2024 रोजी गोंडवाना विद्यापीठातंर्गत विविध परीक्षा केंद्रावर करण्यात आले आहे.
विद्यापीठाअंतर्गत शिवाजी महाविद्यालय, गडचिरोली, महिला महाविद्यालय, शासकीय विज्ञान महाविद्यालय, पदव्युत्तर शैक्षणिक विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, गडचिरोली या 6 परीक्षा केंद्रावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या सेट परीक्षा कक्षाद्वारे एकूण 1670 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
सेट परीक्षा ही गोंडवाना विद्यापीठातर्फे 2012 पासून सुव्यवस्थितपणे पार पाडण्यात येत असून दोन सत्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे. पहिला पेपर सकाळी 10 ते 11 वाजताच्या कालावधीत तर दुसरा पेपर सकाळी 11:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत असणार आहे.
विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावरून उपलब्ध करून घ्यावे. परीक्षा केंद्रावर मोबाईल, कॅल्क्युलेटर किंवा लॉगटेबल आणू नये. तसेच दिलेल्या वेळेच्या 30 मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. विद्यापीठाने दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करुन शांततामय वातावरणात परीक्षा पार पडेल याची खबरदारी घ्यावी, असे गोंडवाना विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा सेट परीक्षा समन्वयक डॉ अनिल चिताडे यांनी कळविले आहे.