गोंडवाना विद्यापीठात संशोधनावर आधारित व्याख्यान संपन्न

संशोधन हे समाजासाठी उपयुक्त ठरणारे असावे – प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे

गडचिरोली : आजचे युग हे संशोधनाचे युग आहे. एखाद्या समस्येचे निराकरण करण्यासाठी, प्रश्नांची उत्तरे शोधून पदोपदी नवे ज्ञान मिळविण्यासाठी व एकंदर मानवी जीवन समृद्ध व प्रगतशील करण्यासाठी संशोधन महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे समाज उपयोगी संशोधनाच्या दिशेने अभ्यास करण्याची गरज असून संशोधन हे समाजासाठी उपयुक्त ठरणारे असावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे यांनी केले. गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात संशोधनावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र- कुलगूरु डॉ श्रीराम कावळे होते. प्रमुख वक्ता म्हणून दिल्ली विद्यापीठ, रामजस कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक डॉ प्रशांत आर्वे, तसेच विविध विभागाचे प्राध्यापक उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्र-कुलगुरु डॉ. कावळे म्हणाले, सध्या संशोधनाची गरज प्रत्येक क्षेत्रात आहे. एखाद्या व्यवसाय यशस्वी करण्यासाठी, एखाद्या रोगावर औषध शोधण्यासाठी संशोधनाची आवश्यकता असते. स्थानिक स्तरावर केलेले संशोधन जागतिक स्तरावर कसे पोहोचविता येईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. विकसित भारताचा संकल्प संशोधनातूनच पूर्ण होऊ शकतो. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण करण्यासाठी विद्यापीठ नेहमीच प्रयत्नशील असून एखादे संशोधन करताना ते समाजोपयोगी असावे असेही ते म्हणाले.

Advertisement

स्थानिक स्तरावर केलेले संशोधन जागतिक किर्तीचे ठरतात – डॉ प्रशांत आर्वे

संशोधन करताना दृष्टिकोन स्पष्ट ठेवावा. वेगवेगळया विषयाचा अभ्यास करताना नवनवीन कल्पना उभ्या राहतात. असंख्य लोक या देशात आहेत ज्यांच्याकडे संशोधक वृत्ती आहे. आज संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. संशोधन करताना विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन तसेच त्या विषयाचे ज्ञान कितपत आहे हे महत्त्वाचे आहे. स्थानिक स्तरावर केलेले संशोधन जागतिक किर्तीचे ठरतात, असेही ते म्हणाले. यावेळी सहाय्यक प्राध्यापक डॉ आर्वे यांनी संशोधनाचे महत्त्व व योगदान, संशोधनाची गरज आणि संशोधन करण्यासाठी असलेल्या महत्त्वाची बाबी याची इत्यंभूत माहिती उदाहरणाद्वारे आपल्या व्याख्यानातून दिली.

प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा डॉ कृष्णा कारू यांनी करून दिला. संचालन प्रा डॉ प्रशांत ठाकरे तर आभार प्रा डॉ संजय डाफ यांनी मानले. यावेळी डॉ अनिरुद्ध गजके, डॉ धनराज पाटील, डॉ मेघराज जोगी, डॉ प्रशांत क्षीरसागर, डॉ मनीष देशपांडे आणि डॉ नंदकिशोर मेश्राम आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page