एमजीएम विद्यापीठात अँटी रॅगिंग विषयावरील व्याख्यान संपन्न
अँटी रॅगिंग कायद्याबद्दल सर्वांनी माहितगार असणे आवश्यक : ऍड.प्रिया भारसवाडकर
छत्रपती संभाजीनगर, दि. २० : शिक्षण घेणे हा विद्यार्थ्यांचा अधिकार असून शिक्षण घेत असताना अधिक जागरूक असणे काळाची गरज आहे. विशेषतः अँटी रॅगिंग कायद्याबद्दल विद्यार्थी माहितगार असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत असणाऱ्या ऍड.प्रिया भारसवाडकर यांनी यावेळी केले. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या डॉ.जी.वाय.पाथ्रीकर संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात ‘अँटी रॅगिंग लॉ इन इंडिया’ या विषयावर आयोजित परिसंवादात ऍड.प्रिया भारसवाडकर या बोलत होत्या. यावेळी, प्राचार्या डॉ.प्राप्ती देशमुख यांनी पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.ऍड.भारसवाडकर म्हणाल्या, शिक्षण घेत असताना समाजात आणि देशामध्ये जे काही सुरू आहे त्याबद्दल आपण सजग असणे आवश्यक आहे. अन्याय करणाऱ्या पेक्षा तो सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो. रॅगिंगमुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीवर परिणाम होतो.
विद्यार्थी म्हणून आपण कोणत्याही क्षेत्रातील शिक्षण घेत असलो तरी अँटी रॅगिंग कायद्यासंदर्भात आपल्याला ज्ञान असावे. हा कायदा कसा तयार झाला, हा कायदा नेमका काय आहे, सोशल मीडिया रॅगिंग काय आहे, या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यास शिक्षेचे काय प्रावधान आहे, महाविद्यालयातील अँटी रॅगिंग समिती कशी काम करते अशा सर्व प्रश्नांची उत्तरे यावेळी ऍड.भारसवाडकर यांनी दिली. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना अँटी रॅगिंग कायद्याबाबत अधिक माहिती व्हावी आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी प्राचार्या डॉ.प्राप्ती देशमुख यांनी विशेष सत्र घेऊन विद्यार्थ्यांना माहिती दिली. या सत्रामध्ये डॉ. संकाये यानी पोर्टलवर माहिती कशी भरायची हे सांगितले.
यावेळी, डॉ.ज्ञानेश्वरी पाटील, डॉ.वैशाली चव्हाण, डॉ.विजय काळे, डॉ.उषा शेटे, प्रा.भालेराव, डॉ.रसिका वडाळकर, प्रा.महाजन, प्रा.सोनल साटोनकर, प्रा.दीपाली सवने,प्रा.लक्ष्मण तौर, प्रा.देशपांडे, प्रा.अपूर्वा ढवळे, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी काकडे यांनी तर आभार प्रा.वैशाली कुंभकर्ण यांनी मानले.
अँटी रॅगिंग संदर्भात अधिक जागृती व्हावी यासाठी निबंध स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
निबंध स्पर्धा
१.संकेत परसुडे
२.राजश्री मस्के
३.रोहित घोडके
पोस्टर स्पर्धा
१. ऋतुजा निकम
२.सोमनाथ स्वामी