अमरावती विद्यापीठात ‘संत गाडगे बाबा व जगद्गुरु तुकोबाराय : एक चिंतन’ या चर्चासत्राचे समारोप
संत गाडगे बाबा भागवत धर्माच्या मंदिराची पताका – प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे
अमरावती : लोकसंत गाडगे बाबा व जगद्गुरु तुकोबाराय यांच्या विचार व कार्यात कमालीचे साम्य असून संत तुकाराम हे भागवत धर्माचे कळस, तर संत गाडगे बाबा ही त्या मंदिरावरील पताका होते, अशा आशयाचे उद्गार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे यांनी काढले. विद्यापीठाच्या संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र व जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संत गाडगे बाबा व जगद्गुरु तुकोबाराय : एक चिंतन’ या चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी अध्यक्षीय भाषण करतांना ते बोलत होते. व्यासपीठावर अतिथी म्हणून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ भैय्यासाहेब मेटकर, माजी मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ मनोज तायडे उपस्थित होते.
उद्घाटनानंतर झालेल्या पहिल्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी जनसाहित्याचे प्रवर्तक डॉ सुभाष सावरकर होते. परिसंवादक प्रा डॉ संजीव कोंडेकर, नागपूर यांनी ‘सुधारक तुकाराम’, तर कोल्हापूरचे डॉ श्रीकांत पाटील यांनी ‘तुकारामाचे संतत्व व कवित्व’ या विषयावर आपले चिंतन मांडले. अमरावतीचे डॉ राजेश मिरगे यांनी संत तुकारामांच्या पाईकाच्या अभंगाव्दारे तुकारामाची राष्ट्रभक्ती स्पष्ट केली. डॉ अलका गायकवाड यांनी ‘विद्रोही तुकाराम’ या विषयावर मांडणी केली. तिसऱ्या सत्रात झालेल्या दुस-या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ काशिनाथ बऱ्हाटे होते.
या परिसंवादात डॉ माधव पुटवाड यांनी ‘तुकारामांची शिकवण’ या विषयावर, तर नागपूरच्या डॉ भारती खापेकर यांनी ‘तुकारामांचा भक्तीयोग’ या विषयावर विचार मांडले. डॉ मंदा नांदुरकर यांनी ‘गाडगे बाबा म्हणजे तुकारामांचा आधुनिक अवतार’ या विषयाची मांडणी केली. तर प्रा संदीप तडस यांनी सर्वज्ञ चक्रधर, महानुभाव पंथ व तुकाराम, गाडगे बाबा यांच्यातील अन्वय स्पष्ट केला. चर्चासत्राचे आयोजन जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष डॉ सतिश तराळ व संत गाडगेबाबा अध्यासन केंद्राचे प्रमुख प्राचार्य दिलीप काळे यांच्या वतीने करण्यात आले होते.