नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागातील मीडिया लेखन कार्यशाळेचा समारोप
भाषाबोध हेच लेखनकलेची आधारशीला – डॉ श्रीपाद जोशी यांचे प्रतिपादन
नागपूर : भाषाबोध हेच लेखन कलेची आधारशीला असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक तथा अखिल भारतीय मराठी महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाद जोशी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर हिंदी विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘मीडिया लेखन कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात शनिवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी डॉ जोशी मार्गदर्शन करीत होते.

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षस्थान हिंदी विभाग प्रमुख डॉ मनोज पांडे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाद जोशी, संपादक निरज श्रीवास्तव, सहयोगी संपादक चारुदत्त कहू यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना डॉ जोशी यांनी. मीडिया लेखनासाठी समाज, संस्कृती आणि भाषेचा गहन बोध असावा लागतो, असे सांगितले. भाषा शिक्षण आणि प्रशिक्षणावर गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भाषा संस्काराचं एक महत्त्वपूर्ण भाग असून ती आपल्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकते, असे डॉ जोशी म्हणाले.
या प्रसंगी ‘पावर ऑफ वन’ (मासिक) चे संपादक नीरज श्रीवास्तव यांनी ज्ञानाचे महत्त्व सांगताना, ज्ञान हा मनुष्याचा सर्वात मोठा शस्त्र आहे, असे सांगितले. ज्ञानाच्या आधारे व्यक्ती प्रत्येक आव्हानावर विजय मिळवू शकतो. त्यामुळे ज्ञान मिळवण्यासाठी मनुष्याला सतत प्रयत्नशील राहायला हवे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंदी विभाग प्रमुख डॉ मनोज पांडेय यांनी भाषा मनुष्याला संस्कारित करते आणि भाषिक कौशल्ये आपल्या विचारशक्तीला विकसित करतात, असे सांगितले. माध्यम लेखनात भाषेची भूमिका समजून घेतल्यास उत्तम परिणाम मिळू शकतात, असे ते म्हणाले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी सहयोगी संपादक चारूदत्त कडू यांनी स्तंभ लेखनाच्या विविध पैलूवर आणि लेखा – डाक विभागाचे राजभाषा अधिकारी तेजवीर सिंग यांनी पत्रलेखन व विज्ञापन लेखनाच्या कलेवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे संचालन डॉ सुमित सिंग यांनी केले आणि आभार प्रा जागृति सिंग यांनी मानले. सर्व सहभागी सदस्यांना अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.