नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागाच्या वतीने जीवनविद्या २ क्रेडिट प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा समारोप

विद्यापीठ औषधी निर्माणशास्त्र विभागाचे आयोजन

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागाच्या वतीने जीवनविद्या ‘लाईफ स्किल्स फॉर सक्सेस’ या २ क्रेडिट प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा यशस्वी समारोप करण्यात आला. औषधी निर्माणशास्त्र विभागाच्या वतीने डॉ ए के डोरले सभागृहात १४ ते १६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हा अभ्यासक्रम पार पडला. या अभ्यासक्रमासाठी एकूण १९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

विद्यार्थ्यांना वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात आवश्यक जीवन कौशल्ये प्रदान करण्याच्या उद्देशाने अभ्यासक्रम राबविण्यात आला. जीवनविद्या फाउंडेशनच्या तत्त्वांवर आधारित आणि जीवनविद्या फाउंडेशनचे जीवन विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै यांनी सिद्ध केलेल्या “सार्वत्रिक मानवी मूल्ये” या अभ्यासक्रमाचा समावेश या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात करण्यात आला. १४ फेब्रुवारी रोजी या अभ्यासक्रमाचे उद्घाटन औषधी निर्माणशास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रशांत पुराणिक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी अभ्यासक्रम समन्वयक डॉ प्रकाश इटनकर आणि डॉ दादासाहेब कोकरे उपस्थित होते. उद्घाटनानंतर उमंग प्रकल्पाच्या प्रकल्प प्रमुख आणि महान ट्रस्ट मेळघाटच्या प्रकल्प समन्वयक माणिकताई पळसकर यांनी “निसर्ग नियम” या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान दिले. त्यानंतर होमिओपॅथी आणि व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉ योगेश किटे यांनी “दैवी मानवी शरीर” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. दिवसाचा समारोप डॉ प्रकाश इटनकर यांच्या “मन:शक्ती” या प्रेरणादायी सत्राने झाला. दुसऱ्या दिवशी बन्सीधर राणे, (सेवानिवृत्त उपमहाव्यवस्थापक, भारत बिजली लि) यांनी “प्रेमाने काम करा” या विषयावर सत्र घेतले, ज्यामध्ये व्यावसायिक जीवनात समर्पण आणि आवड असणे किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट करण्यात आले.

Advertisement

त्यानंतर औद्योगिक मानसशास्त्रज्ञ आणि ओडी डब्ल्यू कन्सल्टन्सीच्या भागीदार स्नेहल दळवी यांनी “यशाची गुरुकिल्ली आणि सवयी व संगत” या विषयावर संवादात्मक सत्र घेतले. दिवसाच्या तिसऱ्या सत्रात नंदादीप आय हॉस्पिटलचे संस्थापक व नेत्रतज्ज्ञ डॉ दिलीप पटवर्धन यांनी “तणावाचा आनंद घ्या,” “प्राधान्यक्रम,” आणि “व्यवसाय व कौटुंबिक नातेसंबंध दृढ करण्याच्या” तंत्रांवर मार्गदर्शन केले.

अभ्यासक्रमाच्या शेवटच्या दिवशी मनीष शिंदे (स्ट्रॅटेजिक बिझनेस लीडर) यांनी “संवाद कौशल्ये व नेतृत्वगुण” या विषयावर माहितीपूर्ण सत्र घेतले. त्यानंतर सिव्हिल ग्लोब कन्सल्टंट्स प्रा लि चे संचालक गौरव दामले यांनी “व्यक्तिमत्व विकास” या विषयावर मार्गदर्शन केले. अखेरचे सत्र बन्सीधर राणे यांनी घेतले, ज्यामध्ये “सार्वत्रिक मानवी मूल्ये” याविषयी सखोल चर्चा करण्यात आली.

अभ्यासक्रमाचा समारोप सत्रसमन्वयक योगेश निकम यांनी अभ्यासक्रमातील महत्त्वाचे मुद्दे संक्षेपात मांडून केला. विद्यार्थ्यांनी आपल्या अभिप्रायाद्वारे या अभ्यासक्रमातून मिळालेल्या ज्ञान व कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. अभ्यासक्रम समन्वयक डॉ प्रकाश इटनकर यांनी आभार मानत समारोप केला. अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विभागाच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. केवळ शैक्षणिक उत्कृष्टता नव्हे, तर जीवनातील मूलभूत कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page