प्रसिद्ध रचनाकार रविंद्र पांडे यांनी दिली एमजीएम विद्यापीठास भेट
कारकिर्द घडविण्यासाठी मुद्रणशैली प्रभावी क्षेत्र – रचनाकार रविंद्र पांडे
छत्रपती संभाजीनगर : मुद्रणशैली ही सृजनशील कला असून कारकिर्द घडविण्याचे प्रभावी क्षेत्र असल्याचे प्रतिपादन नामवंत रचनाकार रविंद्र पांडे यांनी आज येथे केले. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या लिओनार्दो दा विंची स्कूल आफ डिझाईनमध्ये (एलएसओडी) उपयोजित कला (अप्लाईड आर्ट) विभागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
उपयोजित कला – अप्लाईड आर्टमधे मुद्रणशैली हा एक खूप महत्वाचा विषय आहे. हा विषय रचनाकारांसाठी अत्यावश्यक आहे. याचा उपयोग आता सर्व कलांमध्ये प्राधान्याने होताना दिसत आहे. मुद्रणशैलीच्या उपयोगाद्वारे आकर्षक चित्रनिर्मित घडते, असे त्यांनी यावेळी सांगितले. मुद्रणशैलीच्या प्रभावी उपयोगाद्वारे त्यांनी अडीचशेहून अधिक कलाकृतींची निर्मीती केली आहे. त्यातील निवडक कलाकृतींच्या निर्मीतीची प्रक्रीयाही त्यांनी यावेळी स्पष्ट करून विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले. प्रा. राजेश शाह यांनी पांडे यांचा परिचय करुन दिला. प्रा. माखनलाल विश्वकर्मा, प्रा. सचिन कांबळे, प्रा. निलेश बनसोडे यांनी यावेळी आपली मते मांडली.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांची त्यांनी यावेळी सदिच्छा भेट घेऊन आपल्या मुद्रणशैलीतील कलाकृतींची माहिती दिली. संस्थेतील स्कूल आफ फिल्म आर्टला पांडे यांनी भेट देऊन माहिती घेतली. विभाग प्रमुख प्रा. शिव कदम यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले.