डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर शहीद स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्याची सूचना
विद्यापीठ प्रशासनाची सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना
मुख्य अभियंत्यांसोबत सविस्तर चर्चा
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या नामांतर शहीद स्मारकाचे काम आगामी तीन महिन्यात पूर्ण करा, अशा सूचना विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नामांतर लढ्यात योगदान दिलेल्या शहिदांच्या स्मरणार्थ ‘नामांतर शहीद स्मारक’ उभारण्यात येत आहे. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सदर कामास मंजुरी देण्यात आली. सदर कामाचा खर्च ३० लाखांपेक्षा अधिक असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सदर काम करून घेण्यात येत आहे. डिसेंबर २०२२ मध्ये या कामाची वर्कऑर्डर देण्यात आली. या कामासाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एक कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.
सदरील कामाची गती वाढवून ते उत्तम दर्जाचे व लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. या संदर्भात कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क करून या कामासंदर्भात माहिती घेतली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कातकडे यांनी त्यांच्यासोबत १४ जून रोजी विद्यापीठात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी कुलुसचिव डॉ प्रशांत अमृतकर, स्थावर विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र काळे यांची उपस्थित होती.
विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या नामांतर शहीद स्मारकाचे काम आगामी तीन महिन्यात पूर्ण करा, अशा सूचना कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी यावेळी केली. तसेच सदर काम अत्यंत दर्जेदार व उत्कृष्ट रीतीने होणे गरजेचे आहे, असे स्पष्टपणे सांगितले. संबंधित कंत्राटदारास यासंदर्भात बोलवून या सर्व सूचना अंमलात आणण्याबद्दल सांगितले. कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर व कार्यकारी अभियंता रवींद्र काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता श्रीनिवास कातखडे यांची बुधवारी (दि २६) कार्यालयात जाऊन भेट घेतली. कुलगुरू यांच्यासोबत झालेल्या चर्चेप्रमाणे कामाची गती वाढवावी, असे लेखीपत्रही विभागाला दिले. मुख्य अभियंता श्रीनिवास कातकडे यांनी संबंधित कंत्राटदारास बोलवून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचनाही केल. सदर काम लवकर पूर्ण करून स्मारकाच्या लोकार्पण करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन आग्रही असल्याचे यावेळी कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी सांगितले .
असे असेल स्मारक…
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट जवळच या स्मारकाचे बांधकाम सुरु आहे. ४० बाय ४० मिटर अर्थात एक हजार सहाशे स्क्वेअर मीटर परिसरात सदर स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकाच्या बाजूचा संपूर्ण परिसर लँडस्केपने सुशोभित करण्यात येणार आहे. स्मारकाच्या चारही बाजूने संरक्षक भिंत असणार आहे. मध्यभागी आठ मीटर उंचीचा शहीद स्तंभ उभारण्यात येईल. नामांतर लढ्यातील शहिद स्मारकाचे स्वरूप वरीलप्रमाणे असणार आहे.