देवगिरी महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे दीक्षारंभ कार्यक्रम संपन्न
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयातील वाणिज्य विभागात नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो अशोक तेजनकर, प्रमुख व्याख्याते म्हणून उपप्राचार्य डॉ विष्णू पाटील आणि आय क्यू ए सी समन्वयक डॉ सुनील टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना वाणिज्य विभाग प्रमुख प्रो डॉ राजेश लहाने यांनी वाणिज्य विभागात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांची विद्यार्थ्यांना माहिती देऊन वाणिज्य विभागात उपलब्ध असलेले विविध कोर्सेस आणि त्यासाठी आवशयक असलेल्या विविध सोयी सुविधा या विषयी मार्गदर्शन केले. तसेच वाणिज्य विभागातुन शिक्षण पूर्ण केल्यानंतर विध्यार्थ्यांना भारतात आणि भारताबाहेर असलेल्या संधी बद्दल माहिती दिली. वाणिज्य विभागात शिक्षण पूर्ण करून वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती तसेच विभागातील विद्यार्थ्यांनी सी ए, सी एम ए, सी एस अशा विविध कोर्सेस मध्ये प्राविण्य मिळविल्याचे सांगितले.
प्रमुख व्याख्याते डॉ विष्णू पाटील यावेळी बोलतांना असे म्हणाले कि महाविद्यालयात विध्यार्थ्यांसाठी भरपूर सुविधा उपलब्ध असून विधार्थांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्या उज्वल भविष्याकडे वाटचाल करावी. आपण विद्यार्थीदशेमध्ये जर मेहनत केली तर आपला सर्वांगीण विकास होऊन आपण निश्चित पणे यशस्वी व्हाल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. महाविद्यालयामध्ये राबविण्यात येणाऱ्या मेन्टॉरिंग पद्धती, राष्ट्रीय सेवा योजना, एन सी सी, विविध ऑनलाईन कोर्सेस तसेच परीक्षा पद्धती याविषयी सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. आय क्यू ए सी समन्वयक डॉ सुनील टेकाळे यांनीही एन पी टी इ एल तसेच स्वयं प्रणाली घेण्यात कोर्सेस विषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो अशोक तेजनकर हे होते. आपल्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलतांना प्राचार्य अशोक तेजनकर असे म्हणाले कि, देवगिरी महाविद्यालय हे ख्यातनाम महाविद्यालय असून या महाविद्यालयातील वाणिज्य विभागाची महाराष्ट्रभर ओळख असून विभागात अनुभवी आणि पात्रताधारक प्राध्यापक कार्यरत आहेत. वाणिज्य विभाग हा संशोधनात हि अग्रेसर असून प्राध्यापकांनी विविध स्तरावर संशोधनात आपला ठसा उमठविला आहे. तुम्ही एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतला असून याचा फायदा तुम्हाला भविष्यात निश्चितपणे होईल.
वाणिज्य विभाग तसेच महाविद्यालयात विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात जसे करियर कट्टा, देवगिरी एफ एम रेडिओ स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र संगीत विभाग, नाट्यशास्त्र विभाग कार्यरत असून त्याचाही फायदा विध्यार्थ्यानी घ्यावा. आपल्या महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांना अनेक पारितोषिके प्राप्त झाले आहेत, दोन प्राध्यापकांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे. विध्यार्थ्यानी पूर्ण मेहनतीने काम केल्यास तो कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
याप्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोगाचा एन इ पी ब्रँड ॲम्बेसेडर महाविद्यालयाचा विध्यार्थी अथर्व पळसकर यानेही एन इ पी विषयी मनोगत व्यक्त केले. तसेचग प्रा मोनिका चक्रवर्ती यांनी ज्वेलरी आणि जेमॉलॉजि या विषयात असणाऱ्या करियर संधी याविषयी माहिती दिल.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डिम्पल भोजवानी यांनी केले तर प्रा डॉ संजय रत्नपारखे यांनी आभार मानले. यावेळी वाणिज्य विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.