अमरावती विद्यापीठात रोजगार मेळाव्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन
विद्यार्थ्यांनो, स्वत:ला सदैव तयार ठेवा, यश निश्चित – जिल्हाधिकारी सौरभ कटियार
विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्य आणखी विकसित करावं – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते
अमरावती : विद्यार्थ्यांनी मनात कसलीही भीती न ठेवता, परीक्षा असो, मुलाखत असो वा त्यासाठी स्वत:ला सदैव तयार ठेवावे, यश निश्चितच मिळेल, असा मौलिक सल्ला अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी विद्यार्थ्यांना दिला. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील ए व्ही थिएटर (दृकश्राव्य सभागृह) येथे शनिवारी ३ ऑगस्ट रोजी आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, अधिसभा सदस्य डॉ आशीष सावजी, एम आय डी सी इंडस्ट्रियल असोसिएशन, अमरावतीचे अध्यक्ष किरण पातुरकर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसेसचे एच आर विशाल रामपल्ले, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे उपायुक्त द लं ठाकरे, सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, विद्यापीठ विद्यार्थी विकास संचालक डॉ राजीव बोरकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, कंपन्यांना नेहमीच मनुष्यबळाची आवश्यकता असते आणि कौशल्ययुक्त मनुष्यबळाला त्यांची पसंती असते. कंपन्यांना हवे असलेले कौशल्य विद्यार्थ्यांनी आपल्यात तयार करावे. त्यामुळे आपल्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असतील. विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्य आणखी विकसित करावे. आज अनेक कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध आहेत, त्याचा लाभ घेऊन आत्मविश्वासाने पुढे जावे, असे मोलाचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना केले.
विद्यार्थ्यांना पोटापाण्याला लावण्यासारखं मोठं काम नाही – किरण पातुरकर
एम आय डी सी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर म्हणाले, विद्यार्थ्यांना पोटापाण्याला लावणं यासारखं मोठं काम नाही. विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. स्वयंसिध्दा उद्योजकता अभियानाच्या माध्यमातून अनेकांना आपण रोजगार मिळवून दिल्याचे सांगतांना पातुरकर म्हणाले, तीनशे पेक्षा जास्त युवक-युवतींना आपण उद्योजक बनविले आहे. उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना इतर शहरांमध्ये न जाता येथेच नोकरी मिळावी, यासाठी अमरावती शहरात आय टी पार्क उभारण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत व त्यात नक्कीच यश मिळेल, असेही ते म्हणाले.
कंपन्यांनी तुम्हाला शोधावे असे कौशल्ययुक्त बना – द लं ठाकरे
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे उपायुक्त द लं ठाकरे म्हणाले, आम्ही तुम्हाला कंपन्यांपर्यंत पोहचविले आहे, मात्र आता तुम्ही असे कौशल्ययुक्त बना, की कंपन्यांनी तुमचा शोध घेतला पाहिजे. एवढेच नाही, तर आपलाही स्वत:चा उद्योग असावा असे ध्येय विद्यार्थ्यांनी ठेवावे, असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्य आणखी विकसित करावं – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते
विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्य आणखी वाढवावे. निवड झाली नाही म्हणून आपण कुठे कमी पडलो, याचे चिंतन करावे, जेणेकरुन ते भरुन काढता येईल व पुढे आपल्याला यश मिळेल, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणातून कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी केले. ते म्हणाले, बजाज फायनान्स कंपनीकडून विविध क्षेत्राची निकड लक्षात घेता, त्यांनी तीन-तीन महिन्यांचे रोजगाराभिमुख असे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत व सदर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावरच रोजगार मिळेल. विद्यापीठासह महाविद्यालयांनी सुध्दा अशा प्रकारचे अभ्यासक्रम राबविल्यास विद्यार्थ्यांना अन्य शहरांमध्ये न जाता स्थानिक स्तरावरच रोजगार उपबल्ध होईल. रोजगार मेळाव्यात आपली निवड झाली नाही, म्हणून कोणीही निराश होऊ नये. आपण कुठे कमी पडलो, याचे चिंतन करावे. इंग्रजी भाषा बोलायला शिका. आपसात ग्रुप तयार करा आणि एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा, त्यात निश्चितच यश मिळेल. विद्यापीठाकडून अशाप्रकारचे उपक्रम पुढेही राबविण्यात येईरल, असा विश्वासही कुलगुरूंनी याप्रसंगी व्यक्त केला.
संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व दीपप्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून विद्यार्थी विकास संचालक डॉ राजीव बोरकर यांनी रोजगार मेळाव्याचे महत्व सांगितले. सूत्रसंचालन अमोल मोहोड यांनी, तर आभार कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयातील कर्मचारी याशिवाय रोजगार मेळाव्याकरीता आलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.