एमजीएम विद्यापीठात ‘कोड क्रुसेडर्स’ स्पर्धा यशस्वीपणे संपन्न

छत्रपती संभाजीनगर : एमजीएम विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुगल डेव्हलपर स्टुडंट क्लब्स कोड क्रुसेडर्स (जीडीएससी) २०२४ स्पर्धा विद्यापीठाच्या आईन्स्टाईन सभागृहात यशस्वीपणे संपन्न झाली. यावेळी कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, टेडएक्स व्याख्याता अद्वैत डंके, गुगल डेवलपर क्लबच्या ग्लोबल कम्युनिटी व्यवस्थापक अनन्या आर, विभागप्रमुख डॉ शर्वरी तामणे, प्रा दीपा देशपांडे व सर्व संबंधित उपस्थित होते.

एमजीएम विद्यापीठामध्ये जीडीएससी अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून कौशल्य विकासासह त्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख होते. याचाच भाग म्हणून ‘कोड क्रुसेडर्स’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

Advertisement

यावेळी बोलताना कुलसचिव डॉ आशिष गाडेकर म्हणाले, एमजीएम विद्यापीठ कायम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारच्या विविध उपक्रमांचे आयोजन करीत आलेले आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना समकालीन काळातील तंत्रज्ञान, संधी आणि आपल्याला भविष्यात आपल्या क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांची माहिती मिळते. अशा प्रकारच्या उपक्रमात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना कायम प्रोत्साहन दिले जाते.

उद्घाटन सोहळा झाल्यानंतर विषयतज्ञ टेडएक्स व्याख्याता अद्वैत डंके आणि गुगल डेवलपर क्लबच्या ग्लोबल कम्युनिटी व्यवस्थापक अनन्या आर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध अॅक्टिविटी घेण्यात आल्या. यामध्ये स्कायरा संघाने प्रथम तर मेडीबडी संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. शेवटच्या पॉडकास्ट सत्रामध्ये विषयतज्ञांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या पॉडकास्टच्या यशस्वी आयोजनात सर्वेश्वर कोहले आणि प्रिया वाघ या विद्यार्थ्यांनी मदत केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ शर्वरी तामणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टीव्हन डिसल्वा आणि सुहानी या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रा डॉ दीपा देशपांडे यांनी मानले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा जयानंद कांबळे आणि प्रा संदीप कंकाळ यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page