अमरावती विद्यापीठाच्या आंबेडकर विचारधारा विभागात छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगे बाबा जयंती उत्साहात साजरी
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागात छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि कर्मयोगी संत गाडगे बाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रा डॉ रत्नशील खोब्रागडे यांनी भूषवले. तर कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून परिवर्तनवादी अभ्यासक बाळासाहेब गावंडे आणि गाडगे बाबांच्या साहित्याचे अभ्यासक डॉ पंकज बानखेडे उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करताना बाळासाहेब गावंडे यांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, नेतृत्व आणि देशप्रेमावर भाष्य केले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी उपस्थितांना प्रेरित केले. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकविषयी माहिती देताना ते म्हणाले, “एक राज्याभिषेक पुरोहित पद्धतीने ६ जून १६७४ रोजी तर दुसरा २४ सप्टेंबर १६७४ रोजी शाक्य पद्धतीने झाला. संत तुकाराम महाराजांनी १६४२ पासून १६५० पर्यंत मार्गदर्शन करून त्यांच्या मावळ्यांना प्रोत्साहित केले.”
कर्मयोगी संत गाडगे बाबांवर विचार मांडताना प्रा डॉ पंकज बानखेडे यांनी संत गाडगे बाबांच्या जीवनातील महान कार्याची ओळख करून दिली. समाजसेवेतील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. संत गाडगे बाबांच्या जीवनचरित्रातील प्रसंग मांडताना ते म्हणाले, “संत गाडगे बाबांचा खराटा श्रमाचे प्रतीक तर कीर्तन हे ज्ञानाचे प्रतीक होते. बंगाली कुमार सेन यांनी गाडगे बाबांचे शेवटचे कीर्तन मुद्रित केले. त्या कीर्तनात गाडगेबाबांनी समाज जीवनाच्या सर्व विषयांना स्पर्श केला. रयत शिक्षण संस्था आणि शिवाजी शिक्षण संस्था यांच्या उभारणीत गाडगे बाबांचे विशेष योगदान आहे.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ रत्नशील खोब्रागडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘स्टेट अँड मायनॉरिटी’ या ग्रंथाचा दाखला देत शिवाजी महाराजांनी शून्य व्याज पतपुरवठा, पीक वाचवण्यासाठी सैन्य, इत्यादी आर्थिक सक्षमीकरणासाठी केलेल्या प्रयत्नानेच ते रयतेचे राजे ठरले, असे उद्गार काढले.
या कार्यक्रमात डॉ सी बी मेश्राम स्मृती सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या छाया बडगे, स्मृतीशेष सत्तेश्वर मोरे सुवर्णपदक प्राप्त करणारे अँड महेंद्र तायडे, संगीता मंडे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा प्रफुल्ल कडू यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद खाकसे यांनी, तर आभार आदिनाथ अंभोरे यांनी मानले. या वेळी विभागातील ज्येष्ठ प्रा डॉ वामन गवई, डॉ पवनकुमार तायडे, प्रा सुरेश पवार, प्रा अरुण रौराळे, प्रा उज्वला इंगोले, प्रा संदीप राऊत, प्रा राहुल मेश्राम तसेच शहरातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे विद्यार्थी डॉ गजानन बनसोड, योगिता थोटे, अनुराधा तायडे, अरुण रामटेके, राजकुमार मतले, सुधाकर पाटील, बापुराव वानखेडे, अनिल वानखेडे, कमल चवरे, विजय इंगळे यांनी केले.