एमजीएम विद्यापीठात उत्साहपूर्ण वातावरणात चरखा पार्क’चे उद्घाटन संपन्न
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्यावतीने आज लिओनार्दो द विंची स्कूल ऑफ डिझाईनचा तळमजला येथे ‘चरखा पार्क’चे गांधी पिस फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार प्रशांत यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्यास एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई, संचालक सुनिल तळेकर, ज्येष्ठ गांधीवादी श्रीराम जाधव, ज्ञानप्रकाश मोदानी व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.



यावेळी बोलताना कुमार प्रशांत म्हणाले, चरखा म्हणजे केवळ एक यंत्र नसून चरखा म्हणजे जीवन जगण्याची कला आहे. चरख्याशिवाय मानवजातीचे भविष्य अंधकारमय असू शकेल. सर्वांनी दिवसभरात १ तास चरखा चालवणे आवश्यक असून यातून बनवलेल्या सुतापासून आपण आपले कपडे बनवू शकतो. चरखा म्हणजे केवळ एक यंत्र नसून चरखा म्हणजे जीवन जगण्याची कला आहे. आपण जीवन जगत असताना आपली कृती ही पर्यावरणपूर्वक असायला हवी. ही कृती चरख्याच्या माध्यमातून आपल्याला करता येते. चरखा चालवत असताना आपल्याला समजते की, कपडा बनवण्यासाठी किती मेहनत लागते. एमजीएम विद्यापीठाने सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत चांगला असून या उपक्रमास मी शुभेच्छा देतो.
चरख्याचा वापर करत आपण स्वतः चे कपडे स्वतः बनवू शकतो. विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी या चरखा पार्कमध्ये येऊन सूतकताई करत आहेत, ही निश्चितपणे आनंदाची बाब आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांनी केले.
यावेळी बोलताना अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई म्हणाले, शून्य वीज आणि शून्य पर्यावरण हानी यासह शाश्वत विकासाच्या वाटेवरून मार्गक्रमण करण्यासाठी विद्यार्थ्यांना या चरखा पार्क’चा उपयोग होणार आहे. एमजीएममध्ये शिकणाऱ्या ३००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना चरखा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
महात्मा गांधी यांच्या १५५ व्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर २०२४ रोजी एमजीएम विद्यापीठाच्या जेएनईसी लॉन्स येथे सुमारे २५६५+ विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी उत्साहपूर्ण वातावरणात सामूहिक चरखा सूतकताई केली. या सामूहिक सूतकताईची आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद झाली आहे. या सामूहिक सूतकताईच्या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट सूतकताई करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पुस्तके भेट देत ‘बेस्ट स्पिनर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘वैष्णव जन तो’ या गीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अनिता फुलवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा मंजिरी लांडगे यांनी केले.