कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तरुणाईच्या जल्लेाषात शिवजयंती साजरी

जळगाव : तरुणाईच्या जल्लेाषात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची काढण्यात आलेली मिरवणूक आणि त्यानंतर पोवाडा, नृत्य, पाळणागीत, नाट्य आदी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाव्दारे केलेल शिवरायांचे स्मरण यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिवजयंती यावेळी अनोखी ठरली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विद्यापीठात सकाळी ९ वाजता मुख्‍य प्रवेशव्दारापासून शिव प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत मावळयांचा वेष, फेटे परिधान करुन विद्यार्थी तर काही नऊवारी साडया घालून  विद्यार्थिनी सहभागी झाल्या.

शिवरायांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत पृथ्वीक पाटील तर जिजाऊंच्या वेशभुषेत श्रध्दा अहिरराव हे विद्यार्थी होते. लेझिम, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक मुख्य प्रशासकीय इमारतीजवळ आली. त्यानंतर सिनेट सभागृहात दोन तासांचा सांस्कृतिक कार्यक्रम  विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सादर केला. यामध्ये महेश शेंडगे याने  शिवजन्माचा आणि अफजलखानाचा वधाचा पोवाडा, राखी शेंडे हिने पाळणागीत, अतुल सुर्यवंशी याने रायगडावरील कथा, माधुरी महाजन, सारिका खारबे, विजय पाटील व महेश जाधव यांनी गीते सादर केली. त्यांना तबल्यावर प्रा.तेजस मराठे व हार्मोनियमवर मनोज गुरव यांनी साथ संगत दिली. विद्यार्थी मनोज पाटील व त्याच्या सहकाऱ्यांनी अफजलखानाचा वध तर व सामाजिकशास्त्र प्रशाळेतील टीना सपकाळे व तिच्या सहकाऱ्यांनी पावनखिंडीतील लढाई ही नाटके सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. 

Advertisement

तसेच ३५० व्या शिवराज्याभिषेका निमित्त आयोजित भित्तीपत्रक स्पर्धेतील विजेते विद्यार्थी वैभव फुंडकर (प्रथम), ज्ञानेश्वर सपकाळे (व्दितीय) तर शीतल सोनवणे व शरद सोनवणे (तृतीय) यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा. म. सु. पगारे, छत्रपती शिवाजी महाराज अध्ययन व संशोधन केंद्राचे प्रभारी प्रमुख प्रा. अजय पाटील, पी. ई. तात्या पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय घोरपडे, विद्यार्थी चिराग चव्हाण, हर्षदा पाटील व रुपाली पाटील यांनी केले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page