कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिन साजरा
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र प्रशाळेअंतर्गत मराठी विभागात मंगळवार दि. २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर आणि कवी वा. ना. आंधळे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी विभागप्रमुख प्रा. म. सु. पगारे होते.

प्रा.डॉ. संदीप नेरकर यांच्या हस्ते मराठी भाषेचे महत्व विशद करणाऱ्या साहित्य सृजन या भित्तीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले. ते म्हणाले भाषा केवळ संप्रेषणाचे माध्यम नाही, तर एका हृदयाकडून दुसऱ्या हृदयाकडे विचार पोहचण्याचे माध्यम आहे. तसेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे विचार पसरवण्याचे साधन आहे. म्हणून माणसाच्या मनात विचार प्रक्रिया ही मातृभाषेतून निर्माण होते.
वा. ना. आंधळे यांनी भाषा हे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अभिसरणाचे माध्यम आहे. कोणतीच भाषा शुध्द – अशुध्द असे काहीही नसते. अनेक बोलीभाषा एकत्र येवून मराठीला मिळाल्या तेव्हा मराठी भाषा समृध्द झाली असे मत मांडले त्यांनी काही कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. म. सु. पगारे यांनी प्रत्येकाने आपआपल्या क्षेत्रात स्वत:ला झोकून दिले पाहिजे अन्यथा तो जिवंतपणी मेलेला असतो सक्षमतेने आयुष्याला भिडता आले पाहिजे तेव्हाच आपण काही मिळवू शकतो. मराठीवर हल्ला होत असेल तर महाराष्ट्र प्रांतात राहणाऱ्या प्रत्येकाच्या अस्मितेवर तो घाला आहे असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन नेत्रा उपाध्ये यांनी केले तर कविता बोरसे यांनी आभार मानले.