महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा कास्ट प्रकल्प वसंतराव नाईक पुरस्काराने सन्मानीत

राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कास्ट प्रकल्पास (दि १ जुलै) कृषि दिनाच्या दिवशी मुंबई येथे नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात वसंतराव नाईक कृषि पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११ व्या जन्मदिनानिमित्त सदरील पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सदरचा पुरस्कार कृषि मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार कुलगुरु डॉ पी जी पाटील, सहप्रमुख अन्वेषक डॉ मुकुंद शिंदे व कास्ट प्रकल्पाचे सदस्य यांनी स्विकारला. पुरस्काराचे स्वरुप रु ५१ हजार रोख व स्मृतीचिंन्ह असे आहे. या पुरस्कार वितरण प्रसंगी राज्याचे कृषि मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ पी जी पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, कार्याध्यक्ष अविनाश नाईक, कोषाध्यक्ष डॉ बकुळ पटेल यावेळी उपस्थित होते.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे सन २०१८-२०२३ या कालावधीत कास्ट प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ सुनील गोरंटीवार, सह प्रमुख अन्वेषक डॉ मुकुंद शिंदे व त्यांच्या टीमने नाविन्यपूर्ण संकल्पना मांडून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतून हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये खेचून आणला. मागील पाच वर्षामध्ये या प्रकल्पातर्फे विद्यार्थी, प्राध्यापक व शेतकरी या सर्वांसाठी अत्यंत मोलाचे संशोधन व भविष्यातील शेतीच्या दृष्टीने महत्वाचे असे बळकटीकरणाचे कार्य झाले आहे.

Advertisement

या प्रकल्पांतर्गत आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय असे ११ प्रकल्प पूर्ण केले आहेत. या प्रकल्पाद्वारे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय नियतकालीकांमध्ये २७ शोध निबंध प्रकाशीत झालेले आहेत तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर २० पुस्तके प्रकाशीत झालेली आहेत. या प्रकल्पामध्ये क्षमता निर्माण कार्यक्रमांतर्गत २५६ प्रशिक्षणे ही ऑफलाईन व २१२ प्रशिक्षणे ऑनलाईन घेण्यात आली. यामध्ये ८२५२० प्रशिक्षणार्थीनी सहभाग नोंदविला. या प्रकल्पांतर्गत ३१ प्राध्यापक, १२ अधिकारी व ९७ विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी परदेशात पाठविण्यात आले. कास्ट प्रकल्पांतर्गत विकसीत केलेल्या विविध नाविन्यपूर्व डिजीटल तंत्रज्ञानामध्ये ४० मोबाईल अॅप्लीकेशन व आठ वेब अॅप्लीकेशनचा समावेश आहे.

कास्ट प्रकल्पातर्फे झालेले शेतीचे बळकटीकरण निश्चितच महाराष्ट्रासाठी व देशासाठी भुषणावह असे आहे. कास्ट प्रकल्पांतर्गत ड्रोन, रोबोटीक्स, आयओटी आणि हायपरस्पेक्ट्रल प्रयोगशाळा उभारण्यात आल्या. या प्रकल्पांतर्गत १४ तंत्रज्ञान व्यावसायीकदृष्ट्या प्रसारीत झाली आहे. या प्रकल्पांतर्गत एक वर्षाचा पदव्युत्तर कोर्स हा पाच विषयामध्ये तयार केला असून पदव्युत्तर व आचार्य पदवीसाठी सात कोर्सेस व १५ प्रमाणपत्र कोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. सेंसर्स, ड्रोन, आयओटी आणि रोबोटीक या विषयातील ३१ टेकनॉलॉजी तयार करण्यात आल्या, त्यातील २१ टेक्नॉलॉजीच्या कॉपीराईट प्राप्त झाल्या असून १ टेक्नॉलॉजी पेटंटसाठी सादर करण्यात आली आहे.

भारतीय नागरी हवामान वाहतूक संचालनालयातर्फे मान्यताप्राप्त असलेले ड्रोन पायलट प्रशिक्षण देणारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे भारतातील पहिले कृषी विद्यापीठ ठरले असून मागील दीड वर्षात या केंद्रातर्फे अडीचशे प्रशिक्षणार्थीना ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. एकंदरीत कास्ट प्रकल्पातील मागील पाच वर्षाच्या कामगिरीमुळे शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यावरती संशोधनासाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण झाल्या असून त्याचा फायदा राज्यातील भविष्यातील शेतीसाठी निश्चित होणार आहे. कास्ट प्रकल्पाला वसंतराव नाईक पुरस्कार मिळाल्या बद्दल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ पी जी पाटील, अधिष्ठाता डॉ दिलीप पवार, संशोधन संचालक डॉ विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ गोरक्ष ससाणे, कुलसचिव अरुण आनंदकर आणि नियंत्रक सदाशिव पाटील यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page