कॅरी ऑन

विजय पांढरीपांडे

ध्या विद्यार्थ्यांचे कॅरी ऑन साठी आंदोलन सुरू आहे. ते अधून मधून सुरूच असते. दबावाला बळी पडून ते कुलगुरूंना मान्यही करावे लागते. सरकारच्या लोकप्रिय लाडकी बहीण योजने प्रमाणे ही लाडके विद्यार्थी योजना राबवावी लागते. कॅरी ऑन म्हणजे कितीही विषयात नापास झाले तरी वर्ष वाया जाऊ नये म्हणून पुढील वर्षात जाण्याची (प्रमोशन) परवानगी. एरवी विद्यापीठात काही अटी, नीती नियम असतात, एका वर्गातून पुढील वर्गात जाण्यासाठी.ते आजच्या तरुण पिढीला जाचक वाटतात. त्यामुळे ते कडक नियम शिथिल करण्यासाठी वेळोवेळी दबाव आणला जातो. त्यात विद्यार्थी संघटना म्हणजेच अप्रत्यक्ष पणे राजकीय पक्ष उतरतात. अन् मग वेळोवेळी ते नियम शिथिल करीत विद्यार्थ्यांना वर्ष वाया जाऊ नये म्हणून वरच्या वर्गात प्रवेश दिला जातो.

पूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षा वगैरे होत असे. आता तर कायद्यानेच शिक्षा बंद झाल्या आहेत. त्याऐवजी निरनिराळ्या सवलती सुरू झाल्या आहेत. परीक्षेचा ताण हा तरुण वर्गासाठी खरेच फार मोठी डोकेदुखी होऊन बसला आहे. त्यातही बोर्डाची परीक्षा, फायनल पदवी परीक्षा, आय आय टी किंवा नीट प्रवेश परीक्षा या सर्वांचे तरुणाई वर खूप टेन्शन असते. फक्त मुलांवरच नव्हे तर पालकांनाही तेव्हढेच टेन्शन असते. काही वेळा हे ताण तणाव आत्महत्ये पर्यंत जाऊन पोहोचतात.

Carry on

यावर उपाय म्हणून परीक्षाच बंद केल्या तर?

कुणाला हा क्रांतिकारी विचार वाचून धक्का बसेल. पण जरा शांतपणे, विवेकाने विचार करा. या परीक्षा घेऊन नेमके काय साधले जाते? या परीक्षांचे निकाल, अन् विद्यार्थ्याची प्रत्यक्ष गुणवत्ता, आकलन, बौद्धिक क्षमता, याचा अर्थाअर्थी काही संबंध असतो का? आश्चर्य म्हणजे कुणाचाच या परीक्षांच्या निकालावर विश्वास नसतो. अगदी परीक्षा घेणाऱ्याचा सुद्धा विश्वास नसतो..! म्हणूनच बोर्डाच्या निकालावर अवलंबून न राहता कॉलेज साठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. विद्यापीठाने च घेतलेल्या पदवी निकालावर अवलंबून न राहता पदव्युत्तर प्रवेशासाठी, अन् पुढे पी एच डी प्रवेशासाठी पुन्हा वेगळी परीक्षा घेतली जाते. नोकरी देणाऱ्या कंपन्या सुद्धा तुमच्या विद्यापीठाच्या गुण पत्रिकेवर विश्वास न ठेवता त्यांची वेगळी टेस्ट, मुलाखत घेतात.

प्रश्न असा की ज्या निकालावर कुणाचाच विश्वास नसतो त्या परीक्षांचा घोळ घालायचा च कशाला ? कारण या परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाला लाखो नव्हे करोडो रुपये खर्चावे लागतात. तो भुर्दंड फी स्वरूपात विद्यार्थी, पालक यांनाच द्यावा लागतो. परीक्षा घेणे, पेपर तपासणे, निकाल लावणे, श्रेणी देणे यासाठी प्रचंड मनुष्य बळ लागते. मग या निकालात चुका होतात. भ्रष्टाचार तर ठरलेला. पेपर फुटणे, चुकीचे निकाल लागणे, निकाल लागण्यात प्रचंड विलंब लागणे, या गोंधळासाठी सारेच परीक्षा विभाग प्रसिद्ध असतात. किंबहुना विद्यापीठ प्रशासनात परीक्षा विभाग सर्वात जास्त बदनाम असतो. तिथल्या जबाबदाऱ्या घाला कुणी प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी सहसा तयार नसतात. परीक्षा विभागात बदली म्हणजे अंदमान ची वारी असा समज..!

विद्यापीठाचे कॅलेंडर बघितले, नीट तपासले तर वर्षभर परीक्षा घेणे, (उशिरा, तेही चुकीचे), निकाल लावणे हा एककलमी कार्यक्रम वर्षभर चालू असतो. त्यातून थोडीफार सवलत, वेळ मिळाला तर मग संशोधन वगैरेचा विचार करावा लागतो !

मग अशा विद्यार्थ्यांना ताण देणाऱ्या, गैरसोयीच्या असलेल्या, पुढील वर्गात जाण्यासाठी अडथळा निर्माण करणाऱ्या परीक्षा घ्यायच्या कशाला, कुणासाठी ? हा प्रश्न निर्माण होतो. आधीच आपल्या कडे जाती धर्मामुळे समाज दुभंगला आहे. भिंती निर्माण झाल्या आहेत. त्यात या परीक्षांच्या निकालामुळे आणखीन भर पडते. कारण हे निकाल जाती, धर्मा व्यतिरिक्त आणखीन नवे वर्ग निर्माण करतात. त्याला प्राविण्य, ते प्रथम वर्गात, ते द्वितीय वर्गात, ते अनुत्तीर्ण असे अनेक जास्तीचे वर्ग परीक्षेच्या निकालाने निर्माण होतात. त्यातूनही तरुण पिढीत स्पर्धा निर्माण होण्या ऐवजी नैराश्य निर्माण होते. न्यूनगंड निर्माण होतो. अनेक जण त्यातून बाहेर येतच नाहीत.

त्यापेक्षा ही कॅरी ऑन ची आयडिया मस्त आहे. लाडके विद्यार्थी योजना म्हणून ती आपल्या कडेच नव्हे तर देश पातळीवर नव्या शैक्षणिक धोरणाचा नवा अजेंडा म्हणून राबवायला हरकत नाही. मागल्या वर्षी लाल किल्ल्या वरून भाषण करताना इज ऑफ लिव्हिंग असा उल्लेख झाला होता. म्हणजे जगणे सुसह्य व्हावे म्हणून करण्यात येणाऱ्या किंवा करावयाच्या उपाय योजना. आज आपल्या कडचे jine सुसह्य नाही म्हणुनच गेली अनेक वर्षे आपली मुले इथे शिकून स्थायिक व्हायला, सुसह्य जीवन जगायला अमेरिकेत, परदेशात निघून जातात. आता ट्रम्प महाशयांनी तिकडचे दरवाजे बंद केले आहेत हळू हळूहळू. तेव्हा आपल्या तरुणांचे जिने आपल्याच स्वदेशात सुसह्य होण्यासाठी काही नव्या क्रांतिकारी उपाय योजना करणे गरजेचे आहे.

याची सुरुवात कॅरी ऑन पद्धतीने करता येईल. विद्यार्थ्यांना परीक्षा ऑप्शनल ठेवाव्या. जबरदस्ती नको. परीक्षांचे आहे तसे गुण द्यावेत. पण पास नापास, श्रेणी, क्लास ही भानगड च नको. प्रवेश घेतल्या पासून शेवटच्या वर्षा पर्यंत त्याने जे काही केले, कमावले त्याचा लेखाजोखा द्यावा. त्यावर कसलाही रिमार्क, श्रेणी न देता. पुढे नोकरी धंद्या साठी त्याची योग्यता उद्योजक, मालक ठरवतील. विद्यार्थ्याला स्वतःला सिद्ध करावे लागेल. विद्यापीठाच्या प्रमाण पत्राची गरज नाही. कारण आजकाल कुणालाच त्याची किंमत राहिलेली नाही. कुणाला किती गुण मिळाले, काय श्रेणी मिळाली यावरून तशीही आजकाल कुणाची योग्यता सिद्ध होत नाही. तसेही आता यापुढे कामाचे, उद्योगाचे स्वरूप आरपार बदलत जाणार आहे. आताच्या पिढीला आपण जे शिकलो ते विसरावे लागणार आहे (अन् लर्न). नवे तंत्र, नवे द्यान आत्मसात करावे लागणार आहे ( री लर्न). सातत्याने नाविन्याचा ध्यास घेत शिकत रहावे लागणार आहे. तेव्हा आपण घेत असलेल्या परीक्षा, त्यात मिळालेले गुण, श्रेण्या, प्रमाण पत्रे याला फारसे महत्व राहणार नाही.

अशा परिस्थितीत वर्षभर परीक्षा घेत बसणे, निकाल लावत बसणे, विद्यार्थ्यांच्या मोर्चाचा सामना करीत विनाकारण वातावरण गढूळ करीत न्यूज चॅनल ला ब्रेकिंग न्युज देत बसणे यापेक्षा सरळ कॅरी ऑन जपत स्वस्थ बसावे.दोन्ही पक्षी नो टेन्शन, नो प्रॉब्लेम !

माजी कुलगुरू डॉ विजय पांढरीपांडे

७६५९०८४५५५

(हे सगळे उपहासात्मक व्यंग म्हणून वाचावे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com