राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात क्षमता विकास आणि कौशल्यवाढ कार्यशाळा
ग्रंथालय आणि माहिती शास्त्र विभागाचे आयोजन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘क्षमता विकास आणि कौशल्यवाढ’ कार्यशाळा मंगळवार, दि १८ मार्च २०२५ रोजी पार पडली. ग्रंथालय आणि माहिती शास्त्र विभागाच्या वतीने या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ समय बनसोड यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून प्रशिक्षक पी विजयालक्ष्मी, आर एस मुंडले कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ मंजू दुबे, आयोजक सचिव डॉ मंगला हिरवाडे यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ समय बनसोड यांनी निश्चित केलेला कोणत्याही संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी सुयोग्य योजना आखण्याची आवश्यकता असते असे सांगितले. सुयोग्य नियोजनामुळे आपल्यामधील उपजत असलेली क्षमता वृद्धिंगत होऊन यश गाठणे सोपे होते असे सांगत उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी असा विश्वास निर्माण केला.
प्रमुख वक्त्या म्हणून नागपूरच्या नामांकित प्रशिक्षक पी विजयालक्ष्मी यांनी मार्गदर्शन करताना ‘व्यावसायिकांसाठी व्यवस्थापन कौशल्य’ या विषयावर अभ्यासपूर्ण संवाद साधला. नागपूरच्या आरएस मुंडले कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ मंजू दुबे यांनी ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर सुयोग्य मार्गदर्शन केले. विभाग प्रमुख तसेच कार्यक्रमाच्या आयोजक सचिव डॉ मंगला हिरवाडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.
कार्यशाळेचे संचालन डॉ प्रीती उमरेडकर यांनी केले तर सहआयोजक सचिव डॉ सत्यप्रकाश निकोसे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सहआयोजक सचिव डॉ शालिनी लिहितकर, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र क्षेत्रातील इतर प्राध्यापकवृंद, ग्रंथपाल, कर्मचारी आणि आजी-माजी विद्यार्थी अशा सर्वांच्या भरघोस उपस्थितीत कार्यशाळा पार पडली. ‘क्षमता विकास आणि कौशल्यवाढ’ या मथळ्याअंतर्गत दिवसभर चाललेली ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपयोगाची ठरली.