गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात मेडी असिस्ट यांच्या वतीने कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह संपन्न
जळगाव : गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगावच्या प्लेसमेंट सेलद्वारे अंतिम वर्षाच्या बेसिक बी एस्सी नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला. या उपक्रमामध्ये ६५ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला व आपल्या व्यावसायिक नर्सिंग कारकिर्दीची सुरुवात करण्याची संधी साधली.




प्रसिद्ध आरोग्य सेवा भरती संस्था टीम मेडी असिस्ट यांनी या ड्राइव्हचे आयोजन केले. या प्रक्रियेत मुलाखती, कौशल्य चाचण्या व विद्यार्थ्यांसोबत संवादाचा समावेश होता.
यावेळी मेडी असिस्ट यांच्या वतीने डॉ आनंद जैन, कोमल चौधरी व नुपूर चौबे यांनी काम पाहिले.
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यातील महाविद्यालयाच्या कटिबद्धतेवर भर दिला. तसेच, आरोग्य सेवा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये व आत्मविश्वास प्रदान करण्यात महाविद्यालयाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात उपप्राचार्या प्रा जसनीत धया, प्रा मनोरा कश्यप, आणि प्रा प्रियांका गवई, कल्याणी देवगडे यांची विशेष उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी या प्लेसमेंट ड्राइव्हला भरभरून प्रतिसाद दिला. अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालय आणि मेडी असिस्ट यांचे आभार मानत व्यावसायिक कारकिर्दीसाठी आधार मिळाल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचा समारोप सकारात्मक वातावरणात झाला. भरती संस्थेने विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे आणि क्षमतेचे कौतुक केले. हा प्लेसमेंट ड्राइव्ह शिक्षण व उद्योग यांच्यातील दरी कमी करण्याच्या महाविद्यालयाच्या प्रयत्नांचे द्योतक ठरला.