नागपूर विद्यापीठाच्या महात्मा गांधी विचारधारा विभागात ‘ग्रंथ परिचय व सामूहिक वाचन कार्यक्रम संपन्न

वाचन संस्कृतीने सभ्यता-संस्कृतीचा विकास – ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक डॉ विजय खंडाळ यांचे प्रतिपादन

नागपूर : वाचन संस्कृतीने समाज आणि जगाच्या सभ्यतेचा आणि संस्कृतीचा विकास होत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ वि भि उपाख्य भाऊसाहेब कोलते ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ विजय खंडाळ यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर महात्मा गांधी विचारधारा विभागात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रम अंतर्गत ग्रंथपरिचय आणि सामूहिक वाचन कार्यक्रम गुरुवार, दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी पार पडला. यावेळी डॉ खंडाळ मार्गदर्शन करीत होते.

प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ वि भि उपाख्य भाऊसाहेब कोलते ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ विजय खंडाळ यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून व्हीएमव्ही महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य आणि इंग्रजी विभाग प्रमुख एस बी सिंग, पदव्युत्तर महात्मा गांधी विचारधारा विभाग प्रमुख प्रमोद वाटकर यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांमध्ये वाचन परंपरा सतत जपण्याकरिता अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे डॉ खंडाळ यांनी पुढे बोलताना सांगितले. महात्मा गांधी यांच्या आदर्श मूल्यांचा परिसंवाद असलेला या विभागातील उपक्रम अधिक विवेकपूर्ण ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे, असे डॉ खंडाळ म्हणाले.

Advertisement

विभाग प्रमुख प्रमोद वाटकर यांनी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत ‘ग्रंथ परिचय व सामूहिक वाचन’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मोबाईल, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात वाचनाचे प्रमाण कमी होत असताना विद्यार्थ्यांमध्ये वाचन उपक्रमांची निकड वाटकर यांनी व्यक्त केली. व्हीएमव्ही महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य आणि इंग्रजी विभाग प्रमुख एस बी सिंग यांनी महात्मा गांधी यांच्यातील ‘प्रॅक्टिकल फिलॉसॉपर’ व्यक्तिमत्त्वाचे शाश्वत मूल्य आपल्या प्रबोधनातून प्रस्तुत केले. स्वातंत्र्य लढ्यातील लोक जीवनात महात्मा गांधी यांनी जी व्रते निश्चयपूर्वक रुजवली त्यावर ‘मंगल प्रभात’ या पुस्तकाचा परिचय आणि समिक्षण आकाशवाणीच्या माजी उद्घोषिका श्रद्धा भारद्वज यांनी करून दिला. अम्बरीश मिश्र यांच्या ग्रंथाचा परिचय डॉ वंदना महात्मे यांनी करून दिला.

डॉ हिम्मत मेश्राम यांनी ‘कि टू हेल्थ’ या पुस्तकाचा परिचय करून दिला तर सर्वोत्कृष्ट ग्रंथपरिचय आणि समीक्षा याकरिता तृप्ती तिवारी यांचा अतिथींच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रवी गुडधे यांनी केले. सर्व धर्म प्रार्थनेने अरुण देशपांडे यांनी कार्यक्रमाचे समापन केले.

याप्रसंगी महात्मा गांधी विचारधारा विभागातील ग्रंथालयातील महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षकांनी सामूहिकरीत्या ग्रंथ वाचन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page