उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त देवगिरी महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न
तरुणांनी रक्तदानाचे महत्त्व जाणले पाहिजे – आ सतीश चव्हाण
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आ सतीश चव्हाण यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.


रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्याचे महत्त्व तरुणांनी जाणले पाहिजे. रक्तदानाच्या माध्यमातून आपण गरजूंना जीवदान देऊ शकतो. यातून सामाजिक सलोख्याची व मानवतेची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजली जाते. आपल्या देशाची ओळख तरुणांचा देश म्हणून केली जाते. मात्र आपल्याकडे वारंवार रक्ताचा तुटवडा असल्याचे निदर्शनास येते. या शहरात वैद्यकीय उपचार घेण्यासाठी मराठवाडा, विदर्भ, खानदेशातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण येत असतात. गरजूंना अनेकवेळा रक्त वेळेवर उपलब्ध होत नाही. तरी आपण रक्तदान हे सामाजिक उत्तरदायीत्व म्हणून स्वइच्छेने केले पाहिजे. महाविद्यालयातील तरुणांचा तर यासाठी मोठा पुढाकार घ्यायला हवा. सामाजिक कार्यात सहभागाचा आनंद हा सर्वोच्च असतो. म्हणून रक्तदानासारख्या देशकार्यात सहभागी झाले पाहिजे असे आव्हान त्यांनी केले. व आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांची विचारपूस केली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालयात प्रतिवर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. मानवतेच्या दृष्टीने या उपक्रमाचे महत्व अनन्यसाधारण आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी. कर्मचारी, खेळाडू, स्वयंसेवक मोठ्या संख्येने यात सहभागी होऊन रक्तदान करतात. ही आनंदाची बाब आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी प्रास्तविकात सांगितले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ अपर्णा तावरे, डॉ रवी पाटील, डॉ विष्णू पाटील, प्रा नंदकुमार गायकवाड, प्रा सुरेश लिपाने, प्रा नलावडे, महात्मा गांधी मिशन वैद्यकीय रुग्णालय रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी आशुतोष देव, डॉ ऐश्वर्या पाटील, डॉ प्रभाकर भोजने, राहुल वाघ हे उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील प्राध्यापक, एनसीसी, एनएसएस विद्यार्थ्यांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या शिबिरात मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. या शिबिराच्या माध्यमातून जवळपास १२० रक्तदात्यांनी रक्तदान केले.