यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रक्तदान शिबीर संपन्न
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विद्याशाखा, महात्मा गांधी अध्यासन आणि अर्पण ब्लड बॅंक, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारती मधील हॉलमध्ये रक्तदान तसेच थॅलेसेमिया मायनर या रोगाची तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबीराचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केले. याप्रसंगी अर्पण ब्लड बॅंकेच्या डॉ. वैशाली काळे यांनी थॅलेसेमियाबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. याप्रसंगी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, अशा प्रकारचे शिबीर विद्यापीठाचे महाराष्ट्रातील 8 ही विभागीय केंद्रावर आयोजीत करण्यात येतील. थॅलेसेमिया रोगाच्या जनजागृतीसाठी विद्यापीठ अर्पण ब्लड बॅंकेस सर्वोतोपरी सहकार्य करेल असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. जयदिप निकम यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आरोग्यविज्ञान विद्याशाखेच्या शैक्षणिक सल्लागार डॉ. संगिता पाटील यांनी केले. याप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव दिलीप भरड, संचालक डॉ. राम ठाकर, डॉ. सुरेंद्र पाटोळे, डॉ. कविता साळुंके, जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे, आदी उपस्थित होते. या शिबीराचा विद्यापीठाचे संचालक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, संयोजक (शैक्षणिक), करारावरील कर्मचारी, बीबीएचे विद्यार्थी तसेच मुक्त विद्यापीठातील महाराष्ट्र शासनाच्या प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरचे विद्यार्थी यांनी लाभ घेतला.