महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पक्षी गणना शिबिर संपन्न

विद्यापीठ परिसरात ५० प्रजातींचे २७० पक्षी नोंदले; दुर्मिळ ‘हयुम्स वॉर्बलर’चे प्रथम दर्शन

नाशिक |

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि अरण्यानी बायोकन्झरवेशन सोसायटी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरात जैवविविधता सर्वेक्षण व पक्षी गणना शिबिर उत्साहात संपन्न झाले. या उपक्रमाचा उद्देश विद्यापीठ परिसरातील जैवविविधतेचा वैज्ञानिक पद्धतीने डेटा संकलित करणे व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा होता.

या प्रसंगी परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. बोधिकिरण सोनकांबळे, विद्यापरिषद सदस्य डॉ. अजित फुंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे तसेच अरण्यानी बायोकन्झरवेशन सोसायटीचे सल्लागार श्री. सतीश गोगटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पक्षी गणना शिबिर संपन्न
A bird counting camp was successfully conducted at Maharashtra University of Health Sciences.

जैवविविधता संवर्धनासाठी विद्यापीठ कटिबद्ध

परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, “आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे केवळ आरोग्य शिक्षणापुरते मर्यादित नसून निसर्ग व पर्यावरण संवर्धनासाठीही तितकेच जागरूक आहे. या पक्षी गणना शिबिराच्या माध्यमातून विद्यापीठ परिसरातील जैवविविधतेचा शास्त्रीय डेटा संकलित केला जात आहे. अरण्यानी संस्थेच्या सहकार्याने राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमध्ये पर्यावरण साक्षरता वाढविण्यास अत्यंत उपयुक्त ठरेल.”

शाश्वत भविष्याकडे टाकलेले पाऊल

वित्त व लेखाधिकारी श्री. बोधिकिरण सोनकांबळे म्हणाले, “पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास टिकून राहणे हे समृद्ध जैवविविधतेचे द्योतक आहे. अशा उपक्रमांमुळे आपण आपल्या सभोवतालच्या पक्ष्यांना व त्यांच्या परिसंस्थेला ओळखू लागतो आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्यास प्रेरित होतो. हे शिबिर म्हणजे शाश्वत भविष्याकडे टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

दुर्मिळ ‘हयुम्स वॉर्बलर’चे नाशिकमध्ये प्रथम दर्शन

अरण्यानी बायोकन्झरवेशन सोसायटीचे सल्लागार श्री. सतीश गोगटे यांनी माहिती दिली की, “आजच्या पक्षी गणनेदरम्यान विद्यापीठ परिसरात सुमारे ५० प्रजातींचे २७० पक्षी आढळून आले. विशेष म्हणजे अत्यंत दुर्मिळ असा ‘हयुम्स वॉर्बलर’ हा पक्षी नाशिकमध्ये प्रथमच नोंदविण्यात आला आहे.”

हा पक्षी साधारणपणे समुद्रसपाटीपासून ३,५०० मीटर उंचीपर्यंतच्या पर्वतीय जंगलात आढळतो. चिमणीएवढ्या आकाराचा हा लहान पक्षी उच्च स्वरात गाण्यासारखा आवाज करतो. झाडांवरील सतत हालचाल आणि रंगसंगतीमुळे तो दिसणे कठीण असते. काराकोरम पर्वतरांगांपासून मंगोलियातील अल्ताई पर्वतांपर्यंत त्याचा विस्तृत अधिवास असल्याचे त्यांनी सांगितले.

अनेक पक्षीप्रजातींची नोंद

या पक्षी निरीक्षण सर्वेक्षणात पारवा, भारद्वाज, पाकोळी, टिटवी, लहान बगळा, ढोकरी, शिकारा, दलदल हरिण, घार, वेडा राघू, खंड्या, तांबट, पहाडी पोपट, हळद्या, सुभग, नाचण, कोतवाल, स्वर्गीय नर्तक (लांब शेपटीचा खाटीक), कावळा तसेच वैभवशाली शेपटीसह मोर अशा अनेक पक्षीप्रजातींचे दर्शन झाले.

या गणनेतील माहिती ई-बर्ड (eBird) प्रणालीद्वारे अद्ययावत करण्यात येत असून ती जगभरातील पक्षी अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

समन्वय व सहभाग

या उपक्रमाचे समन्वयन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. शिबिरात श्री. सतीश गोगटे, श्री. मनिष गोडबोले, श्री. गणेश वाघ, श्री. गंगाधर आघाव, श्री. रोहित मोगल, श्रीमती पद्मजा ओतुरकर, श्रीमती सीमा तंगडपल्लीवार, श्रीमती चारुशिला शुक्ल यांसह अनेक पक्षीमित्रांनी सक्रिय सहभाग नोंदवला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com