शिवाजी विद्यापीठाच्या भुयारी मार्ग कामाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शनिवारी भूमीपूजन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम भागास कायमस्वरुपी जोडण्याकरिता भुयारी मार्ग व सर्व्हिस रस्ता बांधण्याच्या कामाचे भूमीपूजन येत्या शनिवारी (दि. ३) दुपारी ३ वाजता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. ही माहिती कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विशेष प्रयत्नांमुळे शिवाजी विद्यापीठाच्या या भुयारी मार्गाच्या कामासाठी महाराष्ट्र शासनाकडून ८ कोटी ४८ लाख ८१ हजार ९४५ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी विद्यापीठास प्राप्तही झाला आहे. त्यामधून या कामास येत्या शनिवारी प्रारंभ करण्यात येत असून मंत्री पाटील यांच्या हस्ते या कामाचे भूमीपूजन होईल.

Advertisement
Chandrakantada Patil

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, शिवाजी विद्यापीठाचा सुमारे ८५३ एकराचा विस्तीर्ण परिसर कोल्हापूर महानगरपालिकेच्या ताब्यात असणाऱ्या जुन्या पुणे-बेंगलोर महामार्गाच्या पूर्व व पश्चिम बाजूस विभागला आहे. या जुन्या पुणे-बेंगलोर महामार्गाचे कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत चौपदरीकरण व मध्य विभाजक तसेच पादचारी फुटपाथ अशा रचनेचे सर्वसाधारणपणे ३३ मीटर रुंदीकरणाचे रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या पश्चिम भागात मुख्य प्रशासकीय इमारतीसह गेल्या साठ वर्षांत उभारलेल्या विविध अधिविभागांच्या इमारती, क्रीडा संकुल इत्यादी इमारती आहेत. पूर्व भागात विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग, स्कूल ऑफ नॅनो सायन्स एन्ड टेक्नॉलॉजी, शाहू रिसर्च सेंटर, शिक्षणशास्त्र, इतिहास, जर्नालिझम व मास कम्युनिकेशन, सायबर सिक्युरिटी सेंटर इत्यादी विभाग आहेत. पूर्व बाजूला यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, वाणिज्य आणि व्यवस्थापन अधिविभाग इत्यादी इमारतींचे बांधकाम सुरू आहे. ते पूर्ण होऊन लवकरच हे विभाग तेथून कार्यान्वित होतील.

विद्यापीठातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिक तसेच अभ्यागत असे सुमारे दोन ते तीन हजार व्यक्तींची मुख्य रस्त्यावरुन दररोज ये-जा असते. विद्यापीठास विभागणारा हा रस्ता द्रुतगतीचा असल्यामुळे पुणे-बेंगलोर एक्प्रेस-वे वरुन कोल्हापूर शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या जलदगती वाहनांच्या सातत्याने वाढत्या वर्दळीमुळे विद्यापीठाच्या पूर्व बाजूकडून पश्चिम बाजूकडे ये-जा करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षक वर्गासाठी सदर रस्ता असुरक्षित बनला आहे. तद्नुषंगाने विद्यापीठाने भुयारी मार्ग व सर्व्हिस रस्ता बांधण्यासाठी विद्यापीठाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्याला शासनाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दि. १५ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली. त्यानंतर १९ ऑक्टोबर २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे २.५० कोटी रुपयांचा निधी विद्यापीठास वितरित करण्यात आला. त्यामधून या कामास प्रारंभ करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page