भारती विद्यापीठाचा ६० वा वर्धापनदिन समारंभ उत्साहात संपन्न
मुलांना मराठी भाषा नव्याने शिकवण्याची गरज – विश्वास पाटील
पुणे : आपल्या भाषेवर व संस्कृतीवर प्रेम केले पाहिजे आणि खिशातल्या मोबाईलचा वापर कमी करून पुन्हा वाचनाकडे वळणे गरजेचे आहे. भाषेची आजची अवस्था पाहता नव्या पिढीतील मुलांना मराठी भाषा नव्याने शिकवण्याची गरज निर्माण झालेली आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी केले.
भारती विद्यापीठाच्या ६० व्या वर्धापनदिन समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ विश्वजीत कदम, उपाध्यक्ष डॉ इंद्रजित मोहिते, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, भारती विद्यापीठ आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ अस्मिता जगताप, सहकार्यवाह व भा म्हेत्रे, डॉ के डी जाधव, डॉ एम् एस् सगरे उपस्थित होते. भारती विद्यापीठाच्या ‘विचारभारती’ या मुखपत्राच्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पाटील पुढे म्हणाले, आज समाजात संस्कृती बाजूला राहून विकृती निर्माण झालेली आहे. पूर्वीचे राजकारणी नेते हे त्यागातून उभे राहिलेले होते. आजच्या नेत्यांमध्ये ती तडफ आणि निष्ठा दिसून येत नाही. आपण आपले आदर्श नीट समजून घेणे आवश्यक आहे. राष्ट्रासाठी, चांगल्या कामासाठी जगावं कसं हे समजायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे.
डॉ शिवाजीराव कदम म्हणाले, गेल्या साठ वर्षांतभारती विद्यापीठाच्या एका बीजाचा वटवृक्ष झालेला आहे. भारती विद्यापीठात शिक्षण घेऊन जगभरात कर्तृत्व गाजवणारे विद्यार्थी हीच भारती विद्यापीठाच्या यशाची पावती आहे. नवे शैक्षणिक धोरण राबवत असताना गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यांना देणे क्रमप्राप्त आहे. केवळ पुस्तकी ज्ञान देऊन भागणार नाही. बदलत्या काळाची पावले ओळखून आपल्याला गुणवत्ता केंद्रस्थानी ठेवून पावले टाकावी लागणार आहेत.
डॉ विश्वजीत कदम म्हणाले, जनसामान्यांचे विद्यापीठ अशी भारती विद्यापीठाची ओळख आहे याचे कारण शिक्षणाबरोबरच समाजाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्राच्या उन्नतीतही या विद्यापीठाने महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आधुनिक शिक्षण क्षेत्रातील बदलत्या घडामोडींत एक पाऊल पुढे राखण्याचे काम भारती विद्यापीठाने सातत्याने केले आहे. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायचा प्रयत्न भारती विद्यापीठाने केलेला आहे. राजेंद्र उत्तुरकर व डॉ ज्योती मंडलिक यांनी सूत्रसंचालन केले. डॉ एम एस सगरे यांनी आभार मानले.