नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात सुरेख लावण्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने

पाहुनिया चंद्र वदन..

नागपूर : पाहुनिया चंद्र वदन.. मला साहेना मदन, राया नटले तुमच्यासाठी, नाचू किती कंबर लचकली आदी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एका पेक्षा एक सुरेख लावण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवक महोत्सव ‘युवारंग २०२५’ गुरुनानक भवन येथे सुरू आहे. महोत्सव दरम्यान नाट्य प्रकारात एकापेक्षा एक प्रस्तुती विद्यार्थ्यांनी सादर केली.

युवक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी बुधवार, दि १२ फेब्रुवारी २०२५ रोजी साहित्य व लावणी प्रकारातील नृत्य स्पर्धा गुरुनानक भवन येथे घेण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटन या कार्यक्रमाला अधिसभा सदस्य सुनील फडके, रोशनी खेळकर, मनीष वंजारी, पूजा हिरवाडे, नृत्य कलावंत आकाश तायडे, विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ विजय खंडाळ यांची उपस्थिती होती. यावेळी अधिसभा सदस्य सुनील फडके व अधिसभा सदस्य रोशनी खेळकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करीत त्यांचे मनोबल वाढविले.

Advertisement

त्यानंतर शास्त्रीय नृत्य प्रकारातील भरतनाट्य, कथ्थक, ओडिसी, कथकली, कुचीपुडी, मणिपुरी, सतरिया, मोहिनीअट्टम आदी नाट्यप्रकार सादर केले. शास्त्रीय नृत्य प्रकारात विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस नृत्य सादर करीत युवा महोत्सवात विशेष रंग भरला. त्याचप्रमाणे दुपारच्या सत्रात लावणी स्पर्धा घेण्यात आली. लावणी स्पर्धेत मोठ्या प्रमाणात स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. एकापेक्षा एक गाजलेल्या लावणीवर नृत्य सादर करीत प्रेक्षकांची वाहवा मिळविली.

आज समारोप

विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवक महोत्सव युवारंगचा समारोपिय कार्यक्रम गुरुवार, दि १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता अंबाझरी रोडवरील गुरुनानक भवन येथे होणार आहे. पुरस्कार वितरण समारंभाला सुप्रसिद्ध सिने अभिनेता अंशुमन विचारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाला प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ समय बनसोड, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ देवेंद्र भोंगाडे, अधिसभा सदस्य विष्णू चांगदे, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रशांत कुकडे, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ विजय खंडाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. तत्पूर्वी सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० दरम्यान लोकनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page