उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी
जळगाव : पत्रकारिता सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे. त्यामुळे समाजहित लक्षात घेत सकारात्मक पत्रकारिता करत लोककल्याणासाठी तीचा वापर करावा असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी येथे केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. सुधीर भटकर, डॉ. गोपी सोरडे, डॉ.सोमनाथ वडनेरे, अॅड.सूर्यकांत देशमुख, रोहित देशमुख यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलतांना युवराज पाटील म्हणाले की, पत्रकार हा विविधांगी असतो असे सांगून त्यांनी बाळशास्त्री जांभेकरांचे दाखले देत बाळशास्त्री जाभेकर कार्यकर्तृत्वातून लक्षात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आजची माध्यमे अमर्यादित असून त्यांना सोशल मीडियाची जोड मिळाली आहे. त्यामुळे विधायक पत्रकारिता करत मानवी मूल्यांची जोपासना प्रत्येक पत्रकारांनी करणे गरजेचे आहे. असेही ते म्हणाले. आजच्या काळातील इंटीग्रेटेड जर्नालिझमचे महत्व विषद करतांना ते म्हणाले की, आज माध्यमांचे स्वरुप बदलले असून ते इंटिग्रेटेड झाले आहे. त्यामुळे पत्रकारितेच्या विद्याथ्र्यांनी पत्रकारितेचे आजचे स्वरुप समजून घेऊन भविष्यात पत्रकारिता करणेचे ध्येय समोर ठेवावे.
प्रारंभी माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. सुधीर भटकर यांच्या हस्ते जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक संचालक प्रा. डॉ. सुधीर भटकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. गोपी सोरडे यांनी केले तर आभार अॅड.सूर्यकांत देशमुख यांनी मानले. यावेळी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचा-यांसह विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वितेसाठी मंगेश बाविसाने, प्रल्हाद लोहार यांनी परिश्रम घेतले.