राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अजीम प्रेमजी फाउंडेशनचा प्लेसमेंट ड्राईव्ह
रोजगार व प्रशिक्षण विभागाचे आयोजन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील ग्रामगीता भवन येथे अजीम प्रेमजी फाउंडेशनचा प्लेसमेंट ड्राईव्ह सोमवार, दि १७ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडला. प्लेसमेंट ड्राईव्हला विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.


प्रभारी प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडे, विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ भूषण महाजन, अजीम प्रेमजी फाउंडेशनचे एचआर अभिषेक झा, सुब्रत मिश्रा व प्रारूप बोरजे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अजीम प्रेमजी विद्यापीठात असोसिएट रिसोर्स पर्सन या पदाकरिता अजीम प्रेमजी फाउंडेशनच्या वतीने या प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले आहे. यापूर्वी देखील फाउंडेशनने विद्यापीठात प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करीत विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना प्र-कलगुरु डॉ राजेंद्र काकडे यांनी उद्योग तसेच विविध संस्थांना अपेक्षित असलेले मनुष्यबळ देण्याचा प्रयत्न विद्यापीठाकडून केला जात असल्याचे सांगितले. मुलाखत प्रक्रियेला योग्य प्रकारे सामोरे जात विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संधी प्राप्त करून घ्यावी असे आवाहन डॉ काकडे यांनी केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान कर्नाटक तसेच उत्तराखंड येथील फाउंडेशनच्या विविध शाळांमध्ये कार्य करण्याची संधी मिळणार आहे.
प्लेसमेंट ड्राईव्हकरीता विद्यापीठाच्या पदव्युत्तर विज्ञान शाखा, सामाजिक शाखा, भाषा शाखा, त्याचप्रमाणे मानव विज्ञान विद्या शाखांमधील विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी उपस्थित होते. या प्लेसमेंट ड्राईव्ह करिता १२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती. दोन दिवस लिखित परीक्षा आयोजित केली जाणार आहे. चाळणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेत अंतिम निवड केली जाणार आहे.