‘स्वारातीम’ विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य हणमंत कंधारकर यांना पीएच डी पदवी प्रदान
मराठवाड्यातील बालहक्कांसाठी संशोधनाला यश
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य व व्यवस्थापन परिषद सदस्य हणमंत नारायण कंधारकर यांना पीएच डी पदवी प्रदान करण्यात आली आहे. “मराठवाड्यातील बालगृहातील बालकांच्या हक्क व संवर्धनामध्ये बालगृहांची भूमिका” या महत्त्वपूर्ण विषयावर त्यांनी संशोधन केले असून, समाजकार्य विभागाचे प्राध्यापक डॉ घनश्याम येळणे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे.
कंधारकर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर, व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्रदादा चव्हाण, कुलसचिव डॉ डी डी पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ एम के पाटील यांसह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या संशोधनामुळे मराठवाड्यातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी बालगृहांच्या भूमिकेवर नव्याने प्रकाश पडला आहे.
कंधारकर यांचे संशोधन समाजातील बालकांच्या हक्कांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा विद्यापीठातील सर्व मान्यवर व्यक्त करीत आहेत.