‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये युवा कार्य प्रशिक्षणांतर्गत ३० विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र प्रदान
नांदेड : महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली असून या योजनेत सहा महिन्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देऊन त्यांच्याकडून कार्यालयीन कामकाज करून घेणे अपेक्षित आहे. यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे. या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन राज्य शासन देणार आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासाठी तीस विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या आहेत. अशा शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या विविध विभागामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू करून घेण्यात आले आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा परिचय उपकुलसचिव व्यंकट रामतीर्थे यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांना करून दिला. यावेळी विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ एम के पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक तथा वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ डी एम खंदारे, नवोपक्रम नवसंशोधन व सहचर्य विभागाचे संचालक डॉ शैलेश वाढेर, उपकुलसचिव व्यंकट रामतीर्थे व प्रशिक्षण, रोजगार व आंतरवासीता विभागाचे समन्वयक डॉ बालाजी मुधोळकर उपस्थित होते.