मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्र प्रयोगशाळेत ‘ऑटोक्लेव्ह’ निर्जंतुकीकरण यंत्र कार्यान्वित
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातील जैविक घटक उत्पादन प्रयोगशाळेत अत्याधुनिक ‘ऑटोक्लेव्ह’ निर्जंतुकीकरण यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या यंत्राचे उद्घाटन विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
हे नूतन यंत्र राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानांतर्गत मिळालेल्या अनुदानातून घेण्यात आले असून, प्रयोगशाळेच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होणार असल्याचे संकेत मिळाले
“अशा प्रकारच्या यंत्रांमुळे नैसर्गिक शेतीला आवश्यक असलेल्या शास्त्रीय पद्धतींना चालना मिळेल. रसायनांचा अतिरिक्त वापर कमी करणे आणि जैविक उत्पादनांची गुणवत्ता वाढवणे शक्य होईल.” – माजी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे

ऑटोक्लेव्ह यंत्राची वैशिष्ट्ये:
- क्षमता: ४२० लिटर
- तापमान: १२०° सेल्सिअस
- वापर: काचेची भांडी व प्रयोगशाळेतील साहित्य वाफेच्या माध्यमातून कमी वेळात निर्जंतुकीकरण करण्यासाठी
- लाभ: जैविक कीड-रोग नियंत्रक व खते यांची गुणवत्ता वाढवणे आणि टिकवणे
प्रात्यक्षिक अवलोकनानंतर उपस्थित मान्यवरांनी प्रयोगशाळेतील कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. नितीन ठोके, प्रशिक्षण सहयोगी श्री. हेमराज राजपूत, कार्यक्रम सहाय्यक श्री. मंगेश व्यवहारे, सेवा सुविधा प्रमुख श्री. सुनील निकम तसेच विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम नैसर्गिक शेतीच्या वैज्ञानिक व प्रयोगशील दृष्टीकोनाचा उत्कृष्ट नमुना ठरला आहे.
