अप्सरा चित्रपटाच्या टीमने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळेस सदिच्छा भेट
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा निर्माते सुनील भालेराव यांच्या ‘भ्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे ‘अप्सरा’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, येत्या १० मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, चित्रपट प्रदर्शनापूर्वी अप्सराच्या टीमने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळेस सदिच्छा भेट दिली. माध्यमशास्त्र प्रशाळेस भेट देण्यापूर्वी निर्माता व कलावंतांनी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांचीही भेट घेतली. यावेळी प्र-कुलगुरु प्रा एस टी इंगळे, वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील, डॉ सुधीर भटकर यांची उपस्थिती होती.
त्यानंतर त्यांनी माध्यमशास्त्र प्रशाळेस भेट दिली. यावेळी माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ सुधीर भटकर यांनी सुनील भालेराव, मुख्य अभिनेता सुयश झुंजुरके, मुख्य अभिनेत्री मयूरी आव्हाड, अक्षता पाडगावकर, खान्देशातील प्रसिद्ध अहिराणी कलावंत सचिन कुमावत, समीक्षा भालेराव, प्रज्ञा त्रिभुवन, गायिका मेघा मुसळे, गायक भैय्या मोरे यांना सन्मानचिन्ह व पुस्तक देवून सन्मानित केले. यानंतर निर्मात्यांसह कलावंतांनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या.
याप्रसंगी युआयसीटीचे विनोद भालेराव, संगणक विभागाचे अजीम काझी, वित्त विभागाच्या करुणा भटकर, माध्यमशास्त्र प्रशाळेचे डॉ गोपी सोरडे, अॅड सूर्यकांत देशमुख, रोहित देशमुख, रंजना चौधरी, मंगेश बाविसाने, प्रल्हाद लोहार, महेश पाटील उपस्थित होते.