डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रासाठी तीन कोटीचा निधी मंजूर

उच्च शिक्षण विभागाचा आदेश जारी

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रासाठी राज्य शासनाच्या वतीने तीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा प्रसार, प्रचार तसेच साहित्यकृतीची निर्मिती करुन अध्यासनाच्या कामास गती देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी यांनी व्यक्त केली. या संदर्भात राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासन आदेश (क्रमांक पुरक-२०२३/प्र.क्र.१०८/विशी-२) याद्वारे मान्यता देण्यात आली. या आदेशात म्हटले आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राकरीता तीन कोटी फक्त एवढा निधी पुढील अटींच्या अधिन राहून वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. केंद्राकरिता कोणतेही नविन पद तयार करता येणार नाही तसेच यासाठी लागणारे मनुष्यबळ विद्यापीठाच्या आकृतीबंधातून उपलब्ध करुन द्यावयाचे आहे.

Dr Suresh Gosavi

शासनाकडून उपलब्ध होणारे अनुदान राष्ट्रीयकृत बँकेच्या नियत ठेवीत गुंतवण्यात येईल आणि या रक्कमेतून प्राप्त होणारी व्याजाची रक्कम अध्यासनाच्या कामकाजासाठी उपयोगात आणली जाईल. अध्यासनाचे महसूल, नियत ठेवींवर मिळालेल्या व्याजातून उभारला जाईल. अध्यासनासाठी चालविण्यात येणा-या पाठयक्रमांतील शुल्क आणि प्रशिक्षण कार्यक्रम व सल्ला-समुपदेशन प्रकल्प चालविण्यातून निर्माण झालेले उत्पन्न यामधून निर्माण केलेल्या महसुल याद्वारे यात भर घालण्यात येईल. अध्यासनासाठी झालेल्या खर्चाची वेळोवेळी संचालक, उच्च शिक्षण (पुणे) यांच्यामार्फत शासनास सादर करण्याची जबाबदारी विद्यापीठाची राहील. सदरहू मंजूर झालेली तरतूद तातडीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांना उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संचालक उच्च शिक्षण यांची राहील, असेही आदेशात म्हटले आहे.

Advertisement


या संदर्भात तत्कालीन कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन या केंद्रास निधी देण्याबद्दल चर्चा केली. तर तत्कालीन कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव डॉ. विकासचंद्र रस्तोगी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासन आदेश जारी करुन केंद्रास निधी देण्यास मान्यता देण्यात आली. नागपूरात झालेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात सदर निधीस मान्यता दिली. डॉ. राजेश रगडे हे सध्या अध्यासन केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. या निर्णयाबद्दल उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी व कुलसचिव दिलीप भरड यांनी आभार मानले आहेत.


 अध्यासनाच्या कामाला गती मिळेल : कुलगुरु
 छत्रपती शिवरायांचे पूर्वज हे वेरूळच्या भोसले घराण्यातील असून मराठवाड्याशी या घराण्याचे ऋणानुबंध आहेत. राज्यशासनाने अध्यासन केंद्रासाठी तीन कोंटीचा निधी दिला ही आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा प्रसार व प्रचार करणे व महाराज्याच्या जीवन कार्यावर संशोधन, अभ्यास व जीवन कार्यासंबंधी साहित्य कृतीची निर्मिती करणे, अध्यासन केंद्रास स्वतंत्र इमारत देऊन कार्यास गती देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page