राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत ३७ लाभार्थ्यांना नियुक्ती आदेश
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात भरती मोहिम
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत ३७ लाभार्थ्यांना कुलसचिव डॉ राजू हिवसे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश शुक्रवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी देण्यात आले. विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील ग्रामगीता भवनात एकूण ५६ पदांच्या इंटर्नशिप करिता ही भरती मोहीम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहकार्याने राबविण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने बेरोजगार युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण मिळावे, त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवी यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरु डॉ संजय दुधे, कुलसचिव डॉ राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या रोजगार व प्रशिक्षण विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’ अंतर्गत या भरती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
भरती प्रक्रिये दरम्यान मुलाखतीनंतर अध्यापन सहाय्यक पदाकरीता १५, कार्यालय सहाय्यक (गट क) १७ तर कार्यालय सहाय्यक (गट ड) करीता ५ अशी एकूण ३७ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना माननीय कुलसचिव डॉ राजू हिवसे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज, विद्यापीठाचे रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ भूषण महाजन यांची उपस्थिती होती.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अध्यापन सहाय्यक, कार्यालय सहाय्यक (गट क पद), कार्यालय सहाय्यक (गट ड पद) या पदाकरिता ही भरती मोहीम राबविली. यामध्ये अध्यापन सहाय्यकांची १८ पदे, कार्यालय सहाय्यक (गट क) २४ तर कार्यालय सहाय्यक (गट ड) ची १४ पदे भरावयाची होती. विद्यापीठ पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांकरीता इंटर्नशिप/ऑन जॉब ट्रेनिंग कार्यक्रम असल्याने येथील विद्यार्थ्यांना यात प्राधान्यक्रम देण्यात आले.
अध्यापन सहाय्यक पदाकरीता २२, कार्यालय सहाय्यक (गट क) २५ तर कार्यालय सहाय्यक (गट ड) करीता २५ उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखत दिली. सदर उमेदवारांचे मुलाखती घेवून कागदपत्राची तपासणी करण्यात आली. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना सहा महिन्यासाठी ६०००/-, ८०००/- व १०,०००/- रुपये विद्यावेतन अदा करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत भरती मोहीम यशस्वी करण्याकरिता विद्यापीठातील अनिकेत गभणे, आशिष गावंडे, प्रितेश शिरसुद्धे, चेतन मानकर, राजेश गुप्ता यांनी सहकार्य केले.