प्रो मधुसूदन पेन्ना यांची आदर्श शोध संस्था संस्कृत अकादमी, हैद्राबाद येथे संचालक पदावर नियुक्ती

प्रो पेन्ना हे स्वतःच विश्वविद्यालय आहेत – प्रो हरेराम त्रिपाठी

माझ्या यशाचे श्रेय संतभूमी महाराष्ट्राला – प्रो मधुसूदन पेन्ना

रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे पूर्व कुलगुरू व भारतीय धर्म, तत्त्वज्ञान तथा संस्कृती संकायाचे अधिष्ठाता प्रो मधुसूदन पेन्ना यांची केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाची आदर्श शोध संस्था संस्कृत अकादमी, हैद्राबाद येथे संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी संस्कृत अकादमीच्या संचालकपदाची सूत्रे हातात घेतली. प्रो पेन्ना यांच्या या नियुक्तीच्या निमित्ताने कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातर्फे एका शानदार उत्कर्ष समारोहात कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी यांच्या हस्ते आयोजित करून प्रो पेन्ना आणि राजेश्वरी पेन्ना यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी यांच्या हस्ते, वैदिक मंत्रांच्या घोषात प्रो पेन्ना यांचा “मधुवागीश” उपाधी देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांनी तसेच सन्निधी पूर्वछात्र संघटनेने प्रो पेन्ना यांचा सपत्नीक विशेष सन्मानपत्र, पुणेरीपगडी, शेला देवून सत्कार केला. प्रो पेन्ना यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू अधिष्ठाता, विभागप्रमुख, अधिकारी व सदस्यांनी उलगडून दाखविले.

प्रो पेन्ना यांनी सत्काराला उत्तर देताना अतिशय नम्रपणे आपल्या यशाचे श्रेय संतभूमी महाराष्ट्राला आणि विश्वविद्यालयाला दिले. हैद्राबाद हून आलेल्या माझ्यासारख्या सामन्य व्यक्तीला महाराष्ट्राने खूप सहज आपलेसे केले. संत गुलाबराव महाराजांच्या साहित्याचे अध्ययन हे माझ्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले. प्रज्ञाचक्षु महाराजांचे अनेक ग्रंथांचे अध्ययन व त्यावर संशोधन करण्याची तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होवून त्यांचे सिद्धांत विश्व संस्कृत परिषदेत मांडण्याची संधी मला मिळाली हा मी महाराजांचा आशीर्वाद समजतो.

Advertisement

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचा संस्कृत अनुवाद ही देखील त्यांचीच कृपा आहे. 24 वर्षाच्या या कालावधीत मला महाराष्ट्राने, नागपूरने भरभरून प्रेम दिले असून हे ऋण घेवूनच मी नवी जवाबदारी स्वीकारत आहे. विश्वविद्यालयाचे स्थान कायमच माझ्या हृदयात असून आपल्या सर्वांचे प्रेम असेच राहो असे भावपूर्ण उद्‌गार प्रो पेन्ना यांनी काढले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी म्हणाले, प्रो पेन्ना हे स्वतःच विश्वविद्यालय असून त्यांच्यामुळेच विश्वविद्यालयाला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. संस्कृत क्षेत्रात प्रो पेन्ना यांच्यासारखे अष्टपैलू व्यक्तित्त्व कर्तृत्व आणि नेतृत्व या दोन्ही दृष्टीने दुर्मिळ आहे. प्रो पेन्ना हे मौल्यवान रत्न असून त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ विद्यापीठ यापुढेही घेतच राहील. विश्वविद्यालयाच्यावतीने मी त्यांना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा देतो.

प्रस्तुत उत्कर्ष समारोहाचे प्रास्ताविक रामटेक परिरार संचालक प्रो हरेकृष्ण अगस्ती यांनी केले. उत्कर्ष समारोहाचे बहारदार संचालन डॉ सुमित कठाळे यांनी तर आभार कुलसचिव प्रो कृष्णकुमार पाण्डेय यांनी मानले. या उत्कर्ष सोहळ्याचे आयोजन अतिशय नेटक्या आणि शानदारपणे भारतीय दर्शन विभाग प्रमुख प्रो कलापिनी अगस्ती यांनी केले. या सत्कार सोहळयाला सर्वच अधिष्ठाता, विभागप्रमुख, संवैधानिक अधिकारी, कर्मयोगी, प्रो पेन्ना यांच्यासाठी आवर्जून पुणे व रत्नागिरी येथून आलेले अनुकमे डॉ दिनेश रसाळ, डॉ दिनकर मराठे आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page